‘पू. भार्गवराम यांना पुष्कळ ताप आला होता आणि त्यांच्या लघुश्वासनलिकांमध्ये जंतूदोष (Bronchitis) निर्माण झाल्यामुळे श्वासोच्छ्श्वास करतांना आवाज येत होता. सर्व औषधोपचार करूनही त्यांचा ताप उणावत नव्हता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. तेव्हा मला त्यांची सहनशीलता, समजूतदारपणा, स्थिरता आणि गुरुदेवांवरील अतूट श्रद्धा प्रकर्षाने जाणवली. त्याविषयीची सूत्रे, तसेच पू. भार्गवराम आणि पू. वामन राजंदेकर यांना एकसारखी आलेली अनुभूती येथे देत आहेत.
१. समजूतदारपणा आणि सहनशीलता !
१ अ. वेदना सहन करणे : मी पू. भार्गवराम यांना विचारले, ‘‘तुमचा घसा आणि अंग दुखत आहे का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हो. माझा घसा आणि अंग पुष्कळ दुखत आहे.’’ त्यांनी वेदना होत असल्याचे न दर्शवता केवळ त्या सहन केल्या.
१ आ. रुग्णालयात भरती करण्याची भीती न वाटणे : मी पू. भार्गवराम यांना विचारले, ‘‘तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाऊया का ?’’ तेव्हा ते अगदी सहजतेने म्हणाले, ‘‘ठीक आहे.’’ (लहान मुले रुग्णालयात जाण्यास घाबरतात; परंतु पू. भार्गवराम घाबरले नाहीत.)
१ इ. आधुनिक वैद्यांना येण्यास पुष्कळ उशीर होत असूनही शांत रहाणे : आम्ही रुग्णालयात जाऊन २ घंटे झाले, तरी तात्काळ वैद्यकीय सेवा विभागातील (Casualty) आधुनिक वैद्य आले नव्हते. त्यामुळे मी अस्वस्थता व्यक्त केली. तेव्हा लगेच पू. भार्गवराम मला म्हणाले, ‘‘आपण प्रतीक्षा करूया. आधुनिक वैद्य आता येतील.’’ ते ऐकून मला माझ्या चुकीची जाणीव होऊन माझी अंतर्मुखता वाढली. यावरून ‘पू. भार्गवराम यांची सहनशीलता किती अधिक प्रमाणात आहे’, याची मला जाणीव झाली.
१ ई. पू. भार्गवराम यांना बोलतांना त्रास होत असूनही आधुनिक वैद्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्वतःच दिली.
१ उ. उपचार चालू असतांना पू. भार्गवराम यांना पुष्कळ वेदना होत असूनही त्यांनी न रडता सर्व सहन करणे : पू. भार्गवराम यांचे ४ प्रकारच्या तपासणीसाठी रक्त घेतले. त्यांना २ इंजेक्शन्स दिली आणि शिरेतून औषधे देण्यासाठी शिरेत सुई (Jelco cannula) लावली. त्यांना एवढ्या वेळा सुईने टोचले, तरी ते एकदाही रडले नाहीत. त्यांना वेदना होत असतांना केवळ भुवया जवळ करून आणि कपाळावर आठ्या घालून त्यांनी वेदना होत असल्याचे दर्शवत सर्व त्रास सहन केले.
२. पू. भार्गवराम यांच्या वागण्यातून ‘संतांमध्ये देहबुद्धी नसते’, हे अनुभवणे
ते पाहून एक ज्येष्ठ परिचारिका मला म्हणाली, ‘‘माझ्या रुग्णालयातील २६ वर्षांच्या अनुभवात ‘शिरेत सुई (Cannula) टोचतांना मूल रडले नाही, असे मी पाहिले नाही.’’ ते ऐकून मला वाटले, ‘ही गोष्ट पू. भार्गवराम यांचे संतत्व दर्शवत आहे.’ तेव्हा मला गुरुदेवांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘संतांमध्ये देहबुद्धी नसते’, हे मी पू. भार्गवराम यांना रुग्णालयात भरती केल्यावर अनुभवले.
पू. भार्गवराम यांनी रुग्णाईत असतांना एकदाही हट्टीपणा केला नाही किंवा ते रडलेही नाहीत. सर्वसाधारणपणे मुले आजारी असतांना पुष्कळ रडतात; मात्र पू. भार्गवराम मोठ्या माणसांसारखे शांतपणे पडून राहिले होते.
३. पू. भार्गवराम यांना लहान मुलांच्या अतीदक्षता विभागात हालवल्यावर त्यांच्या उशीच्या मागे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवल्यावर तेथील वातावरणात हलकेपणा जाणवून प्रकाश वाढणे
मध्यरात्री पू. भार्गवराम यांना लहान मुलांच्या अतीदक्षता विभागात (Pediatric ICU मध्ये) हालवण्यात आले. तेव्हा तेथील वातावरणात पुष्कळ जडत्व होते. तिकडे गेल्यानंतर मी पू. भार्गवराम यांच्या पलंगाची त्वरित कापूर, अत्तर आणि विभूती यांनी शुद्धी केली. नंतर पू. भार्गवराम यांच्या उशीच्या मागे डोक्याजवळ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला. त्यानंतर काही घंट्यांतच तेथील वातावरण पुष्कळ हलके झाले. ‘रात्रीची वेळ असूनही त्या ठिकाणी प्रकाश वाढला आहे’, असे मला जाणवले.
४. पू. भार्गवराम यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर असलेली असीम श्रद्धा !
४ अ. पू. भार्गवराम त्यांच्या पलंगाजवळ येणार्या प्रत्येकाला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ दाखवून त्यांच्याविषयी सांगत होते.
४ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहून एका परिचारकेने त्यांना ‘भगवंत’ असे संबोधणे आणि ‘पू. भार्गवराम यांना भगवंताचे (गुरुदेवांचे) आशीर्वाद असल्यामुळे त्यांना काही होणार नाही’, असे सांगणे : पू. भार्गवराम यांनी एका परिचारिकेला बोलावून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ तिच्या हातात दिला आणि तिला तो पहायला बसवून घेतले. त्या परिचारिकेनेही तो संपूर्ण ग्रंथ पाहिला. तिला तो ग्रंथ फार आवडला. तिची भावजागृती झाली आणि ती गुरुदेवांना ‘भगवंत’, असे संबोधू लागली. ती मला म्हणाली, ‘‘भार्गवरामला भगवंताचे (गुरुदेवांचे) पुष्कळ आशीर्वाद आहेत. त्याला काहीही होणार नाही.’’
४ इ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे निर्देश करून पू. भार्गवराम यांनी ‘मला भीती वाटत नाही’, असे परिचारिकेला सांगणे : परिचारिका इंजेक्शन द्यायला आल्यावर पू. भार्गवराम यांना म्हणाली, ‘‘घाबरू नकोस. अगदी लहानसे इंजेक्शन आहे.’’ तेव्हा पू. भार्गवराम यांनी त्वरित त्यांच्या डोक्यामागे ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथाकडे बोट दाखवून सांगितले, ‘‘हे बघा, माझ्या पाठीशी कोण आहेत ते ! त्यामुळे मला भीती वाटत नाही आणि मला दुखणारही नाही.’’
५. स्वच्छता कर्मचारी महिलेने पू. भार्गवराम यांच्या चरणांना स्पर्श करून ‘हे भगवंताचेच रूप आहे’, असे सांगणे
लहान मुलांच्या अतीदक्षता विभागात स्वच्छता करण्यासाठी एक महिला कर्मचारी येत होती. एकदा पू. भार्गवराम यांच्या चरणांना स्पर्श करून ती म्हणाली, ‘‘हे भगवंताचेच रूप आहे.’’ ती पू. भार्गवराम यांच्याकडे एकटक पहात होती. पू. भार्गवराम यांनी तिला ‘तुम्ही येथे केलेली स्वच्छता पुष्कळ चांगली झाली आहे’, असे सांगून तिचे कौतुक केले.
६. पू. भार्गवराम यांची अखंड स्थिरता पाहून मी संपूर्ण दिवसभर भावस्थितीत रहात होते.
७. पू. भार्गवराम यांच्याकडून मिळणार्या चैतन्याचा जाणवलेला परिणाम !
अ. मला रुग्णालयात झोपण्यासाठी जागा नसल्यामुळे माझी रात्रीची झोप पूर्ण होत नव्हती. मला केवळ ३० मिनिटे झोपल्यावर ४ घंटे झोपून उठल्यासारखे ताजेतवाने वाटत होते.
आ. रात्री मी रुग्णालयात एकटी रहात असूनही मला थकवा जाणवत नव्हता.
इ. रुग्णालयापासून आमचे घर दूर आहे; परंतु मी घरी जाऊन स्नान करून डबा घेऊन आणि इतर गोष्टी करून आधुनिक वैद्य पू. भार्गवराम यांची तपासणी करायला येण्यापूर्वी परत येत होते. तेव्हा सर्वकाही अत्यल्प वेळात होत होते.
८. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर पू. भार्गवराम यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होणे
‘पू. भार्गवराम यांच्या रक्ताच्या अहवालावरून त्यांची प्रकृती एवढी का खालावली आहे ?’, याचे कारण आधुनिक वैद्यांना आणि मला समजत नव्हते. तेव्हा ‘यामागे निश्चितच आध्यात्मिक कारण आहे’, हे आमच्या लक्षात आले. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. पाची (पू. राधाआजी, पू. भार्गवराम यांच्या पणजी, वडिलांची आजी आणि सनातनच्या ४४ व्या समष्टी संत) हे दोघे प्रतिदिन पू. भार्गवराम यांच्यासाठी नामजप करत होते. त्या दोन संतांनी आध्यात्मिक उपाय केल्यामुळेच पू. भार्गवराम यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.
९. पू. भार्गवराम यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातून पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत असल्यामुळे बरे वाटत आहे’, असे सांगणे आणि पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ४ वर्षे) यांनीही तसेच सांगणे
पू. भार्गवराम यांनी सांगितले, ‘‘माझ्याजवळ ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातून पिवळा प्रकाश प्रक्षेपित होत असल्यामुळे मला चांगले वाटत आहे.’’ योगायोगाने त्याच दिवशी सौ. मानसीताईने (पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ४ वर्षे) यांच्या आईने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)) भ्रमणभाषवरून मला सांगितले, ‘‘पू. वामन राजंदेकर यांनीही असेच सांगितले.’’ त्याच दिवशी पू. भार्गवराम यांना रुग्णालयातून घरी सोडले.
१०. कृतज्ञता
गुरुदेवांच्या कृपेने मी पू. भार्गवराम यांची गुरुदेवांवरील अतूट श्रद्धा आणि स्थिरता असलेले हे प्रसंग लिहू शकले. याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कृतज्ञतापूर्वक,
सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू, कर्नाटक. (१०.६.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक