व्‍यायामासंबंधी शंकानिरसन

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १३३

वैद्य मेघराज पराडकर

लठ्ठपणामुळे पुढे आलेले पोट छातीला समांतर आणण्‍यासाठी पोटाच्‍या स्नायूंचे व्‍यायाम नियमित करावेत !

श्री. रजत वाणी, जळगाव : बर्‍याच जणांचे पोट पुढे येते. काही वेळा अशा व्‍यक्‍ती फार व्‍यायाम करू शकत नाहीत. अशा वेळी कोणते व्‍यायाम करावेत ?

उत्तर : ‘सतत बसून कामे करणे, शरिराची हालचाल न होणे, व्‍यायाम न करणे इत्‍यादी कारणांमुळे पोटाचे स्नायू सैल होतात. मेद (चरबी) वाढल्‍यावर तो बहुधा पोटाच्‍या भागात साठून रहातो आणि पोट पुढे येते. यामुळे पाठीच्‍या स्नायूंवर ताण येतो आणि पाठ दुखू लागते. पाठ, कटी (कंबर) आणि पाय दुखण्‍याचे एक मुख्‍य कारण ‘पुढे आलेले पोट’ही असू शकते. पुढे आलेले पोट सौंदर्याच्‍या दृष्‍टीनेही चांगले दिसत नाही. असे पोट न्‍यून करण्‍याचा सोपा उपाय म्‍हणजे ‘पोटाच्‍या स्नायूंना बळकटी देणारे व्‍यायाम नियमित करणे’.

पुढील मार्गिकेवर सर्वांना सहज करता येण्‍यासारखे पोटाच्‍या स्नायूंचे ५ व्‍यायाम दिले आहेत. बाकी कोणतेही व्‍यायाम करण्‍यास वेळ मिळाला नाही, तरी हे ५ व्‍यायाम नियमित करावेत. नियमित हे व्‍यायाम केल्‍याने पुढे आलेले पोट छातीला समांतर होण्‍यास साहाय्‍य होईल. एकाएकी भरपूर व्‍यायाम न करता टप्‍प्‍याटप्‍प्‍याने व्‍यायाम वाढवावा. दिवसातून २ वेळा पोट रिकामे असतांना हे व्‍यायाम केल्‍यास लवकर लाभ होईल.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)

व्‍यायाम समजून घेण्‍यासाठी मार्गिका (लिंक) : bit.ly/vyayampot