कुडाळ शहरात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करू पहाणार्‍या संघटनांची चौकशी करा ! – वैद्य सुविनय दामले, कुडाळ

प्रार्थनास्थळांवरून मोठ्या आवाजात लावले जाणारे भोंगे बंद करण्याचीही मागणी !

वैद्य सुविनय दामले

कुडाळ – कुडाळमधे जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणार्‍या काही संघटना त्यांचे स्थान पक्के करू पहात आहेत. या कट्टर आणि भविष्यात डोकेदुखी ठरू शकणार्‍या संघटनांची कायदेशीर चौकशी करावी. शहरात फिरणार्‍या अनोळखी व्यक्ती, कामगार,  परधर्मीय, तसेच व्यापारी यांच्यावर लक्ष ठेवावे. त्यांच्या आधारकार्डची नोंदणी आणि ओळख पडताळून त्यांना व्यवसायाला अनुमती द्यावी. शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी. या कामी आम्ही पोलिसांना साहाय्य करू. अन्य प्रार्थनास्थळांवरील भोंगे लोकांना त्रास होईल, एवढ्या मोठ्या आवाजात लावले जातात. ते बंद व्हावेत. जेणेकरून समाजात जातीय, धार्मिक तेढ न वाढता सलोखा नांदेल, असे निवेदन वैद्य सुविनय दामले यांनी येथील पोलीस ठाण्यात दिले आहे.

या निवेदनात वैद्य दामले यांनी म्हटले आहे की, शहरातील बाळा राणे यांनी या विषयाच्या अनुषंगाने २६ जानेवारी या दिवशी घोषित केलेले आंदोलन हे त्यांचे वैयक्तिक असले, तरीही जागरूक नागरिक म्हणून माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. यात कोणतेही पक्षीय राजकारण नाही. कृपया याची नोंद घेऊन शांततापूर्ण तोडगा बाळा राणे यांना द्यावा.

या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठवल्याचे वैद्य दामले यांनी निवेदनात म्हटले आहे.

वैद्य सुविनय दामले यांनी दिलेले निवेदन – 

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

शहराच्या बाहेरून आलेले नागरिक तेढ  निर्माण करत आहेत ! – नागरिकांचे मत

काही दिवसांपूर्वी बाळा राणे यांनी प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांविषयी प्रशासनाला निवेदन दिले होते. याविषयी कुडाळ शहरातील देवस्थानातील बारा पाचाचे मानकरी आणि शहरातील नागरिक यांची शहरातील पानबाजार येथील बाबाचाँद दर्ग्यात बैठक झाली. या वेळी त्यांनी ‘कुडाळ शहरातील हिंदू-मुसलमानांमध्ये कोणत्याही प्रकारची जातीय तेढ नाही. शहराच्या बाहेरून व्यवसायासाठी आलेले नागरिक सामाजिक माध्यमांद्वारे तेढ निर्माण करत आहेत. जर कुणी ध्वनीक्षेपकाचा त्रास होतो, अशी तक्रार पोलीस ठाण्यात देत असेल, तर त्यांच्याशी आमचा संबंध नाही. शहरातील हिंदू आणि मुसलमान यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत आणि यापुढे रहाणार आहेत, असे सांगितले होते.

हे पण वाचा : सिंधुदुर्ग : पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचे प्रशासनाला निवेदन