प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा घालावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार !

सावंतवाडी मनसेची चेतावणी

सावंतवाडी – तालुक्यातील बहुतांश प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांच्या कर्णकर्कश आणि त्रासदायक आवाजावर मर्यादा घालण्यात यावी, तसेच याविषयी योग्य ती कार्यवाही करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ‘कारवाई न झाल्यास मनसे आक्रमक भूमिका घेऊन आवाज अल्प करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरेल’, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी शहरात, तसेच तालुक्यात बहुतांशी प्रार्थनास्थळांवर लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकांचे आवाज कर्णकर्कश आणि त्रासदायक असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. मुंबई उच्च न्यायालयाने अधिक आवाज असणार्‍या प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचा आदेश दिला असून आवाजाची मर्यादाही घालून दिली आहे. त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही.

या वेळी पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी, ‘प्रार्थनास्थळांचे प्रमुख असणार्‍या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना तशा सूचना देण्यात येतील आणि त्यानंतरही कृती न झाल्यास संबंधितांवर गुन्हे नोंद केले जातील’, असे आश्वासन दिले. (मनसेच्या चेतावणीनंतर बैठक घेणार्‍या पोलीस निरीक्षकांनी ही बैठक आधीच का घेतली नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही का करत नाहीत ?