गोवा : कळंगुट परिसरातील ‘डान्स बार’, वेश्याव्यवसाय आणि अमली पदार्थ व्यवसाय बंद करा !

  • स्थानिकांची शांततापूर्ण मोर्चाद्वारे मागणी

  • मोर्चात आमदार मायकल लोबो आणि सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचाही सहभाग

डान्स बार आणि अंमली पदार्थांविरोधात स्थानिकांचा शांततापूर्ण मोर्चा

म्हापसा – ‘बंद करो, बंद करो, डान्सबार बंद करो’ असा घोषणा देत आणि हातात ‘आमचे गाव वाचवा, आमचे भविष्य वाचवा’ असे  हस्तफलक घेऊन कळंगुट आणि बागा परिसरातील शेकडो नागरिकांनी कळंगुट येथे शांततापूर्ण मोर्चा काढत कळंगुट परिसरातील अनधिकृत ‘डान्स बार’ बंद करण्याची मागणी केली. या मोर्चामध्ये ग्रामस्थ काळे कपडे परिधान करून सहभागी झाले होते. आमदार मायकल लोबो आणि सरपंच जोसेफ सिक्वेरा हेही या मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.

(सौजन्य : Goan Vibes) 

कळंगुट येथील अनधिकृत डान्स बार, दलाली आणि अमली पदार्थ व्यवसाय यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी ८ जानेवारी या दिवशी या मोर्चाचे आयोजन केले होते. स्थानिक नागरिकांनी गेले अनेक दिवस अनधिकृत डान्सबारच्या विरोधात आंदोलन छेडले आहे आणि ८ जानेवारीला काढलेला मोर्चाही त्याचाच एक भाग आहे. या मोर्चाला कळंगुट येथील श्री जांभळेश्वर मंदिराकडून प्रारंभ झाला आणि हा मोर्चा बागा येथील पुलाच्या ठिकाणी थांबला. मोर्चा चे शेवटी लहान सभेत रूपांतर झाले.

डान्सबारविरोधी आंदोलन बंद करण्यासाठी देहलीतील व्यावसायिकांकडून माझ्यावर दबाव ! – सरपंच जोसेफ सिक्वेरा

या सभेला संबोधित करतांना सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले, ‘‘कळंगुट पंचायत क्लब किंवा डान्स बार चालवण्यासाठी कुणालाही अनुज्ञप्ती देत नाही, तर केवळ उपाहारगृह चालवण्यास अनुज्ञप्ती दिली जाते.

(सौजन्य : ingoanews) 

अनधिकृतपणे डान्स बार चालवणार्‍यांना वैयक्तिक स्तरावर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या मागणीला अनुसरून पंचायतीने सुनावणीही घेतली आहे. डान्स बारच्या विरोधातील आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. जनतेचा पाठिंबा असल्यासच हे आंदोलन यशस्वी होईल. या आंदोलनात प्रत्येक कृती कायद्याने केली पाहिजे. डान्सबारच्या विरोधात आंदोलन बंद करण्यासाठी देहली येथील व्यावसायिकांकडून माझ्यावर दबाव येत आहे; मात्र मी त्यांना ‘कळंगुट परिसर स्वच्छ करायचा आहे’, असे सांगितले आहे.’’

स्थानिकांमध्ये जागृती केल्यास ८० टक्के डान्स बार बंद होतील ! – आमदार मायकल लोबो

या वेळी आमदार मायकल लोबो म्हणाले, ‘‘कळंगुट येथील एका ‘डान्स बार’च्या बाहेर ७० ते ८० ‘बॉडी बिल्डर’ उभे रहातात. ते ग्राहकांना लुटत आहेत. कळंगुट परिसरात अशा प्रकारचे ५ अनधिकृत डान्स बार आहेत. ५ ते ८ लाख रुपये प्रतिमास भाडे मिळत असल्याने स्थानिक नागरिक ‘डान्स बार’ चालवण्यासाठी जागा देतात. पैसे मिळतात; म्हणून कळंगुट परिसरातील अनधिकृत काम चालू ठेवायचे का ? स्थानिकांमध्ये डान्स बारच्या विरोधात जागृती केल्यास ८० टक्के अनधिकृत डान्स बार आपोआप बंद होतील. अनधिकृत डान्स बार बंद न केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई लवकरच प्रारंभ होणार आहे.’’

स्थानिकांच्या मते ‘डान्स बार’ हा मोठा रोग असून तो पंचायत क्षेत्रात पसरलेला आहे. या रोगावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सहन करावे लागतील. दर्जेदार पर्यटक येणे बंद होणार आहे आणि त्यामुळे येथील व्यवसायावर परिणाम होणार आहे.’’

संपादकीय भूमिका

राज्यातील अवैध प्रकार बंद होण्यासाठी सरकारने आता ठोस कृती करणे आवश्यक !