कालक्षेपो न कर्तव्यः क्षीणमायुः क्षणे क्षणे ।
यमस्य करुणा नास्ति कर्तव्यं हरिकीर्तनम् ।।
अर्थ : वेळ वाया घालवू नये; कारण आयुष्य क्षणाक्षणाला न्यून होत असते. यमराज (मृत्यूची देवता) दया दाखवणार नाहीत; म्हणून हरिकीर्तनात (नामजप करण्यात) वेळ घालवावा.
कधीही अनावश्यक गोष्टी करण्यात आपला वेळ वाया घालवू नये. त्याचे पहिले कारण आहे – ‘क्षीणम् आयुः क्षणे क्षणे’, आपले आयुष्य प्रत्येक क्षणी न्यून होत आहे. स्वतःचे वय किंवा निघून गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून वेळ वाया घालवू नका.
कारण ‘यमस्य करुणा नास्ति ।’, यमराजाला दया नाही. जेव्हा तो येतो, तेव्हा आपण असे म्हणू शकत नाही की, कृपया थांबा, मला आधी जाऊन बँकेतून पैसे काढावे लागतील. तो ऐकणार नाही आणि आपल्याला त्याच्या समवेत जावे लागेल. आपले कर्तव्य काय असावे ? ‘कर्तव्यं हरिकीर्तनम् ।’ म्हणजे हरिकीर्तन करणे. यावरून व्यष्टी साधनाच महत्त्वाची आणि ती त्या त्या वेळेत करणे किती आवश्यक आहे ? हे लक्षात येते.
(साभार : सामाजिक माध्यम)