श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा २० डिसेंबर या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी विशेष पथक नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार गृहमंत्र्यांनी विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा केली. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या समितीचा अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्याची मागणी केली. त्यानुसार ‘येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पथकाचा चौकशी अहवाल सादर करू’, अशी घोषणाही या वेळी गृहमंत्री फडणवीस यांनी केली.

या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई का करण्यात आली नाही यामागे राजकीय दबाव होता का याविषयी चौकशी करण्यात येईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले.