भारताच्या सीमेवर आता विकासकामे होत आहेत ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिलाँग (मेघालय) – देशातील मागील सरकारची मानसिकता फूट पाडण्याची होती; मात्र आमचा विकासाचा महामार्ग आहे. भारताच्या सीमेवर आता विकासकामे होत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित ‘नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल’च्या ५० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.

१. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, फुटबॉलमध्ये कुणी खेळाडूवृत्ती दाखवली नाही, तर त्याला ‘रेड कार्ड’ दाखवून बाहेर काढले जाते. त्याच धर्तीवर आम्ही मागील ८ वर्षांत ईशान्य भारताच्या विकासाला मारक ठरणार्‍या अनेक गोष्टींना ‘रेड कार्ड’ दाखवले. सरकार भ्रष्टाचार, भेदभाव, घराणेशाही, हिंसाचार, प्रकल्पांत अडथळे निर्माण करणे आणि मतपेटीचे राजकारण हद्दपार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. ‘या आजाराची मुळे अतिशय खोल असतात’, हे तुम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून हे ‘आजार’ मुळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत.

२. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. ते म्हणाले की, पूर्वी संपूर्ण ईशान्य भारत बंद, उपोषण, बाँबस्फोट आणि गोळीबार यांसाठी ओळखला जात होता. विविध संघटनांचे आतंकवादी ईशान्येतील जनतेला त्रास देत होते. याचा फटका स्थानिक पर्यटन आणि उद्योग यांना बसत होता. गेल्या ८ वर्षांत अशा घटनांत तब्बल ७४ टक्क्यांंची घट झाली. सुरक्षा कर्मचार्‍यांवरील आक्रमणांतही ६० टक्क्यांची घट झाली. नागरिकांच्या मृत्यूशी संबंधित घटनांतही ८९ टक्के घट झाली असून जवळपास ८ सहस्र तरुणांनी आत्मसमर्पण केले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे यश आहे.