मध्यप्रदेशातील मुसलमान संघटनांचाही ‘पठाण’ चित्रपटाला विरोध !

  • चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप

  • संपूर्ण देशात कुठेही चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची चेतावणी

भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘पठाण’ चित्रपटाला हिंदूंच्या पाठोपाठ आता मुसलमानांकडूनही विरोध केला जात आहे. ‘पठाण’ चित्रपट देशात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही’ अशी चेतावणी उलेमा बोर्ड आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटी’ यांनी दिली आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केल्यामुळे हिंदूंनी विरोध केला आहे, तर चित्रपटातील काही दृश्ये आक्षेपार्ह असल्याचे मुसलमान संघटनांचे म्हणणे आहे.

१. उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद अनस अली यांनी म्हटले की, ‘पठाण’ हा मुसलमानांतील सर्वांत सन्मानित समाज आहे. या चित्रपटात केवळ पठाणच नाही, तर सर्व मुसलमानांची अपकीर्ती करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव ‘पठाण’ असून त्यात महिला अश्‍लील नृत्य करतांना दिसत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी पठाण हे नाव हटवावे आणि त्यानंतर हवे ते करावे. जर असे झाले नाही, तर आम्ही कायदेशीर लढा देऊ.

२. ‘ऑल इंडिया मुस्लिम त्योहार कमिटी’चे अध्यक्ष परिजादा खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की, या चित्रपटात मुसलमानांच्या भावना भडकावण्यात आल्या आहेत. शाहरुख खान असो किंवा दुसरा कुठलाही खान, आम्ही मुसलमान धर्माचा अपमान होऊ देणार नाही.