अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून सहस्रो भाविक येथे येत असतात; मात्र येथील प्रवासी सुविधेकडे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे छत नादुरुस्त झाल्याने ते कोसळण्याच्या स्थितीत आहे.
येथील बसस्थानकाच्या भोवती रिक्शा आणि विनाअनुमती फळगाड्यांचा गराडा असतो. परिणामी गाडी बसस्थानकातून बाहेर काढतांना बसचालकास तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. प्रतिदिन अशी परिस्थिती असूनही पोलीस यंत्रणा आणि आगार व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची नोंद घेत नसल्याने हे प्रकार चालू आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. (विनाअनुमती वाहनांवर नियंत्रण नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विनाअनुमती वाहनांवर कठोर कारवाई केल्यासच ही स्थिती पालटू शकेल. – संपादक)
पोलीस गेल्यानंतर बसस्थानकाभोवती अवैध वाहनांची वर्दळ ‘जैसे थे’ होते ! – रमेश मंथा, आगार व्यवस्थापक, अक्कलकोट
बसस्थानकापासून २०० मीटर अंतरापर्यंत अवैध प्रवासी वाहतूक असू नये. यासाठी मी वेळोवेळी पोलीस प्रशासनास पत्रव्यवहार केला आहे. पोलीस आल्यानंतर वाहने निघून जातात. पोलीस गेल्यानंतर पुन्हा अवैध वाहनांची वर्दळ ‘जैसे थे’ असते. बसगाडी स्थानकातून बाहेर काढतांना किंवा प्रवेश करतांना खासगी वाहन चालकासमवेत अनेक वेळा बसचालकांचे वाद होत आहेत.