बेंगळुरूनंतर आता भाग्यनगरमध्येही भारतद्वेष्टा कलाकार वीर दास याचा कार्यक्रम रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधाचा परिणाम !

भाग्यनगर (तेलंगाणा) – भारतद्वेषी आणि हिंदुद्वेष्टा विनोदी कलाकार वीर दास याचा भाग्यनगरमध्ये २० नोव्हेंबर या दिवशी होणारा कार्यक्रम हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे रहित करण्यात आला. येथील शिल्पाकला वेदिका येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता; परंतु हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित विरोधामुळे हा कार्यक्रम रहित करण्यात आला, अशी माहिती स्थानिक इंग्रजी वृत्तपत्र ‘द हंस इंडिया’ने दिली.

याआधी वीर दास याचा बेंगळुरू येथे १० नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमही रहित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने हिंदु जनजागृती समितीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

वीर दास याने वॉशिंग्टन येथील कार्यक्रमात केलेली भारतद्वेषी विधाने !

वीर दास याने गेल्या वर्षी वॉशिंग्टन येथील कार्यक्रमात म्हटले होते की,

• मी त्या भारतातील आहे, जेथे दिवसा तर स्त्रियांची पूजा केली जाते; परंतु रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात येतो.
• मी त्या भारतातील आहे, जेथे एकीकडे आम्ही शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगतो, तर दुसरीकडे भाजी पिकवणार्‍या शेतकर्‍याला पायदळी तुडवले जाते.