खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भाडेवाढीविरोधात परिवहन अधिकार्‍यांची ‘नागरिकांनी तक्रार करावी’, अशी अपेक्षा !

मुंबई – खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भाडेवाढीविरोधात परिवहन अधिकार्‍यांची ‘नागरिकांनी तक्रार करावी’, अशी अपेक्षा आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भाडेवाढीच्या संदर्भात परिवहन अधिकार्‍यांना संपर्क केला असता काही अधिकार्‍यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली.

नागरिकांनी जागरूक राहून तक्रार करावी !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना मुंबई (पूर्व) येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे म्हणाले, ‘‘वृत्तपत्रांमध्ये तक्रार करण्यासाठी करण्यासाठी आम्ही आवाहन केले आहे; परंतु हे आवाहन सर्वजणच वाचतात असे नाही. एस्.टी.च्या गाड्यांच्या दीडपट तिकीटदर आकारता येतो, हे नागरिकांना ठाऊक आहे. त्याहून अधिक दर आकारला, तरी प्रवासी पैसे द्यायला सिद्ध असतात. नागरिकांनी जागरूक राहून या विरोधात तक्रार करावी.’’

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पुणे येथील परिवहन अधिकार्‍यांना संपर्क केला असता त्यांनी ‘आमच्याकडे अद्याप एकही तक्रार आलेली नाही’, असे सांगितले होते.

संपादकीय भूमिका

असे असले, तरी ज्या गोष्टी प्रशासनाला ठाऊक आहेत, त्याविषयी प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?