पणजी – गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून अवैधपणे वास्तव्य केलेल्या बांगलादेशी मुसलमान नागरिकांना कह्यात घेण्यास प्रारंभ झाला आहे. गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्) २३ ऑक्टोबरला मेरशी येथे भाड्याच्या खोलीत रहाणार्या २ कुटुंबांतील १२ जणांना कह्यात घेतले.
मेरशीवाडी येथे भाड्याच्या खोलीत बांगलादेशी कुटुंबीय रहात असल्याची माहिती गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाला मिळाल्यानंतर पथकाने संबंधित व्यक्तींची चौकशी चालू केली असता, मेरशीवाडी येथील बेनेडिटा कार्दोझ यांच्या मालकीच्या खोलीत २ बांगलादेशी कुटुंबे भाड्याने रहात असल्याची माहिती समोर आली. पथकाने त्यांची कसून चौकशी केली असता, महंमद फाजलू फकीर, पत्नी शिवली फकीर, यांच्यासह ३ मुली आणि २ मुलगे यांना कह्यात घेतले. दुसर्या खोलीत रहाणार्या महंमद रेहमान गाजी आणि त्याची पत्नी फरजाना महंमद गाजी यांच्यासह त्यांच्या २ मुलींना कह्यात घेण्यात आले आहे.
या सर्वांना जुने गोवे पोलिसांकडे सुपुर्द केल्यावर जुने गोवे पोलिसांनी या लोकांना मायदेशी पाठवण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी विदेशी नोंदणी क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाकडे (एफआरआरओ) सुपुर्द केले होते. एफआरआरओने म्हापसा स्थानबद्धता केंद्रात जागा नसल्यामुळे या लोकांना रहात्या खोलीतच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश जारी करून जुने गोवे पोलिसांना त्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे.