भारतीय वायूदलात स्वदेशी बनावटीच्या ‘लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स’चा समावेश

जोधपूर (राजस्थान) – भारतीय वायूदलामध्ये स्वदेशी बनावटीच्या ‘लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स’चा ३ ऑक्टोबर या दिवशी समावेश करण्यात आला. येथे वायूदलाच्या तळावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हे हेलिकॉप्टर्स वायूदलाला सुपुर्द करण्यात आले. या वेळी हिंदु, शीख, मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मांचे धर्मगुरु उपस्थित होते.

या वेळी कार्यक्रमाला संबोधित करतांना राजनाथ सिंह म्हणाले की, या हेलिकॉप्टर्ससाठी नवरात्रीपेक्षा चांगला वेळ आणि राजस्थानच्या मातीपेक्षा चांगली जागा असू शकत नाही. वीरांच्या भूमीपासून नवरात्रीतच हे हेलिकॉप्टरर्स वायूदलाला देण्यात येत आहेत. यामुळे वायूदलाची शक्ती वाढेल. देशाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा हा अभिमान असणार आहे. सुमारे ३ सहस्र ८८५ कोटी रुपये खर्चून तयार केलेली १५ हेलिकॉप्टर्स वायूदलात सामील होत आहेत.