पणजी, २९ सप्टेंबर (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात उत्कृष्ट प्रतीचा गांजा, चरस आणि विविध प्रकारचे रासायनिक अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याची माहिती या कारागृहातून जामिनावर मुक्तता करण्यात आलेल्या गोव्यातील एका बंदीवानाकडून मिळाली आहे.
त्याचे म्हणणे आहे, ‘‘अमली पदार्थांचा व्यवसाय करणार्यांचे जाळे कोलवाळ कारागृह आणि कारागृहाबाहेर कार्यरत आहे. येथील बंदीवानांना पुरवले जाणारे अमली पदार्थ गोवा आणि गोव्याबाहेरील राज्यांतून येत असतात. अमली पदार्थ पुरवणारे, त्याची विक्री करणारे हे मागणीनुसार हे अमली पदार्थ म्हणजेच त्यांच्या भाषेत ‘माल’ बंदीवानांना पुरवतात, तसेच या पदार्थांची किंमत देण्यासाठी चोरट्या मार्गाने रोख रक्कमही कारागृहात पाठवली जाते. कारागृहाबाहेर असलेल्या अमली पदार्थ व्यावसायिकांकडून हे पदार्थ आणणार्यांना पैसे दिले जातात. कोलवाळ कारागृहात अमली पदार्थांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतो. याला कारागृहातील सुरक्षारक्षकांची फूस आहे. त्यामुळे हे पदार्थ कारागृहात सहज उपलब्ध होतात.’’
अलीकडेच कोलवाळ कारागृहात चोरून अमली पदार्थ नेणारा सुरक्षारक्षक सूरज गावडे याच्या विरोधात कोलवाळ पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या प्रकरणी सुरक्षारक्षक गावडे आणि कारागृहातील बंदीवान यांच्यात दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाच्या न्यायवैद्यकीय चाचणीवर पोलीस अवलंबून आहेत. न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल येण्याची ते वाट पहात आहेत. ‘हे अमली पदार्थ योगेश पागी या व्यक्तीने विकास भगत या कारागृहातील बंदीवानाला देण्यासाठी माझ्याकडे दिले होते’, अशी स्वीकृती सूरज गावडे यांनी दिली आहे. प्रसिद्धीमाध्यमे आणि इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्यासंबंधी अन्वेषण करण्यासाठी पोलिसांना कारागृहातील अधिकारी सहकार्य करत नसल्याचे समजते. (यातून हा गैरव्यवहार कारागृहातील सर्व जण संगनमताने करत आहेत, हे उघड होते ! – संपादक)