सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची सेवा करण्याची लाभलेली अपूर्व संधी !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. स्वप्नात पैंजण घातलेले पुष्कळ मोठे पाऊल दिसणे आणि त्याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘मी तुझ्या घरी रहायला येणार आहे’, असे सांगणे

‘गुरुराया, तुमच्या कृपेमुळे २०.१.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. बाबांचा (माझे वडील आणि सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे यांचा) ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी सोहळा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या काळात मला एक स्वप्न पडले. मला स्वप्नात पैंजण घातलेले एक पुष्कळ मोठे पाऊल दिसले आणि त्यानंतर मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे मुखदर्शन झाले. मी त्याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना (माझ्या मोठ्या बहिणीला) सांगितले. त्या वेळी त्या मला सहज म्हणाल्या, ‘‘अगं, मी तुझ्या घरी रहायला येणार आहे.’’ हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ हे घरी रहायला येणार असल्यामुळे आनंद होणे

गुरुमाऊली, मी किती भाग्यवान आहे ! माझ्याकडे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. आई (माझी आई आणि सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे) आणि पू. बाबा (माझे वडील पू. सदाशिव परांजपे) येणार होते. २४.१.२०२२ या दिवशी आम्ही सर्व जण गोव्याहून मिरज येथे माझ्या सासरी यायला निघालो. ‘माझ्याकडे सर्व जण येणार’, म्हणून मी आनंदात होते; मात्र माझ्या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी दडपण होते; कारण माझ्या घरी पहिल्यांदाच सद्गुरु गाडगीळकाका आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रहायला येणार होते. पू. आई आणि पू. बाबा गोव्याला रहायला गेल्यामुळे देवाने मला ही सेवेची संधी दिली.

३. लक्ष्मी-नारायणरूपी दांपत्य श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

सौ. शीतल गोगटे

२४.१.२०२२ या दिवशी आम्ही रात्री ९ वाजता मिरज येथे पोचलो. माझ्या कुटुंबियांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांचे छान स्वागत केले. आमच्याकडून आमच्या घरात आलेल्या लक्ष्मी-नारायणाची सेवा चालू झाली.

३ अ. देवीस्वरूप श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

३ अ १. गोवा येथील श्री शांतादुर्गादेवीला प्रार्थना करणे : मी गोवा येथे असतांना पू. आईच्या समवेत श्री शांतादुर्गा मंदिरात गेले होते. त्या वेळी माझ्याकडून श्री दुर्गामातेला प्रार्थना झाली, ‘हे श्री दुर्गामाते, मी तुझेच तत्त्व घेऊन जात आहे. तूच माझ्याकडून सेवा करवून घे.’

३ अ २. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ प्रत्यक्ष दुर्गामाताच आहेत’, या भावाने ‘त्यांच्यातील चैतन्य ग्रहण करता यावे’, यासाठी प्रार्थना होणे : माझ्या मनात ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ प्रत्यक्ष दुर्गामाताच आहे आणि ती माझ्या घरी आली आहे’, हा भाव होता. माझ्याकडून ‘मी प्रत्येक क्षणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत असावे आणि मला त्यांच्यातील चैतन्य ग्रहण करता यावे’, अशी प्रार्थना होत होती. त्यांना भेटायला अनेक साधक येत होते. त्यामुळे मला त्यांचा सत्संगही मिळत होता.

३ अ ३. ‘घरी देवीचे आगमन झाले आहे’, असे वाटणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे जेवढे वर्णन करावे, तेवढे अल्पच आहे. त्या आमच्या घरी असतांना ‘प्रत्यक्ष देवीच आमच्या घरात वावरत आहे’, असे मला वाटू लागले. त्यांचे ते मोहक मुखमंडल पाहिले की, मला ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटत असे. मला त्यांची सात्त्विकता सहन होत नसे. त्यांची प्रत्येक हालचाल मला देवीची आठवण करून देत असे. ‘माझ्या घरी देवीचे आगमन झाले आहे’, असे मला वाटू लागले. महर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ २९.१.२०२२ या दिवशी चेन्नई येथे गेल्या. देवाने तोपर्यंत माझ्याकडून त्यांची सेवा करवून घेतली.

३ आ. विष्णुस्वरूप सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

३ आ १. सद्गुरु गाडगीळकाकांचे कानाचे शस्त्रकर्म झाल्याने त्यांना विश्रांती घेण्यासाठी घरी रहावे लागणे : मिरजेला असतांना सद्गुरु गाडगीळकाकांना एका कानाने ऐकू येत नव्हते. तेव्हा सांगली येथील एका नाक, कान आणि घसा तज्ञांनी त्यांच्या कानाची तपासणी करून त्यांच्या कानाचे शस्त्रकर्म केले. सद्गुरु गाडगीळ काकांच्या कानाचे शस्त्रकर्म झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी त्यांना पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. त्यामुळे त्यांना गोवा येथे लगेच जाता येणार नव्हते. ‘आता सद्गुरु काका माझ्याकडे रहातील आणि मला त्यांची सेवा करायला मिळेल’, असे मला वाटत होते. मला थोडी काळजीही वाटू लागली, ‘माझ्याकडून सद्गुरु काकांची सेवा नीट होईल का ?’; कारण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ मला अल्पाधिक सांगायला नव्हत्या आणि सद्गुरु काका प्रथमच माझ्याकडे एकटे रहाणार होते.

३ आ २. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

३ आ २ अ. सद्गुरु गाडगीळकाकांची कमालीची शिस्त पाहून भारावून जाणे आणि ते कुटुंबियांशी एकरूप झाल्याने दडपण न येणे : मी गुरुमाऊलींना प्रार्थना केली, ‘तुम्हीच आमच्याकडून परिपूर्ण सेवा करवून घ्या.’ मला ‘सद्गुरु काका विष्णुस्वरूप आहेत’, असे वाटू लागले. मी तसा भाव ठेवून त्यांची सेवा करू लागले. सद्गुरु काकांची शिस्त कौैतुकास्पदच आहे ! मी अशी शिस्त कुणातच पाहिली नाही. त्यांच्या पलंगावर सकाळी घातलेली चादर रात्रीपर्यंत तशीच न विस्कटलेली असायची. त्यांचे कपडे स्वच्छ आणि व्यवस्थित घड्या घातलेले असायचे. त्यांची ही शिस्त अंगी बाणवण्यासारखी आहे. त्यांचा आहारही सात्त्विक आहे. त्यांच्या बोलण्यात एवढी नम्रता आहे की, आम्हाला ‘ते सद्गुरु आहेत’, असे वाटतच नव्हते. ‘त्यांचे वेळेवर उठणे आणि वेळेवर सात्त्विक आहार घेणे’, ही त्यांच्यातील कमालीची शिस्त पाहून आम्ही भारावून गेलो. ते आमच्या कुटुंबियांशी एकरूप झाले होते. त्यामुळे आम्हाला दडपण आले नाही.

३ आ २ आ. सद्गुरु गाडगीळकाका साधकांना कोणत्याही वेळी नामजप शोधून देतांना पाहून ‘ते धन्वंतरिस्वरूप आहेत’, असे वाटणे : मला त्यांच्यात देवाला अपेक्षित असे सर्व गुण जाणवले. ते साधकांना कोणत्याही वेळी (प्राणशक्तीवहन पद्धतीप्रमाणे) नामजप शोधून देत होते. ते पाहून मला ‘सद्गुरु काका आम्हा साधकांसाठी धन्वंतरिस्वरूप आहेत’, असे वाटले. त्यांच्याविषयी जेवढे लिहावे, तेवढे अल्पच आहे.

४. किती सेवा करू मन भरेना ।

मला एक मास गुरुमाऊलींनी इतकी सुंदर सेवा दिली की, त्याविषयी सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच अपुरे आहेत. मला सद्गुरु गाडगीळकाका, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू, पू. आई आणि पू. बाबा यांच्याविषयी सुचलेल्या ओळी पुढे दिल्या आहेत.

किती उपकार मानू गुरुराया ।
असा सेवेचा लाभ दिलास ।। १ ।।

सद्गुरु आणि संत येती घरा ।
तोची दिवाळी दसरा ।। २ ।।

किती सेवा करू संतांची ।
किती सेवा करू मन भरेना ।। ३ ।।

‘देवा, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात काही उणे राहिले असल्यास या लेकरास क्षमा करा. आमच्या कुटुंबाला अशीच सेवेची संधी द्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. शीतल अभय गोगटे (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची लहान बहीण, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), मिरज, सांगली. (३.३.२०२२)

श्री लक्ष्मीची कृपा आणि पैसा

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अमृतवचन

‘पैसे असणे आणि श्री लक्ष्मीची कृपा असणे’ यांमध्ये पुष्कळ अंतर आहे. केवळ श्रीमंत असून चालत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत, त्याने ‘ते कोणत्या मार्गाने आणि कोणत्या उद्देशाने मिळवले आहेत ?’, हे त्या व्यक्तीला अन् देवालाच ठाऊक असते. अयोग्य मार्गाने आणि वाईट उद्देशाने मिळवलेले धन म्हणजे ‘श्री लक्ष्मीकृपाविरहित पैसे’ असतात. असा धनसंचय विकारांना आमंत्रण देतो आणि मनुष्याची वृत्ती नासवतो. यातून मनुष्य पापाचा भागीदार होतो. असे पैसे कोट्यवधीने जरी सत्कार्यासाठी दिले, तरी त्यातून देणार्‍याला लाभ होत नाही. जेव्हा सन्मार्गाने आणि प्रामाणिकपणे कष्ट करून धन मिळवले जाते, तेव्हा व्यक्तीच्या मनात ‘देवाच्या कृपेमुळेच मला हे धन लाभले आहे’, असा भाव असतो. अशा व्यक्तीवर श्री लक्ष्मीची कृपा होते. अशा धनातील एक रुपयाही ईश्वरी कार्यासाठी अर्पण केला, तरी तो सहस्रो रुपयांचे कार्य करतो. श्री लक्ष्मीची कृपा असलेले धन दान करणारा आणि त्याचा ईश्वरी कार्यासाठी योग्य वापर करणारा या दोघांचीही साधना होते अन् त्यांना देवाचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे ‘पैसे मिळवायचे कि श्री लक्ष्मीची कृपा संपादन करायची ?’, हे ज्याचे त्याने ठरवावे.

अयोग्य मार्गाने पैसे मिळवणार्‍या मनुष्यावर लक्ष्मीची कृपा नसल्याने तो पैसे असूनही रात्रभर झोपत नाही, तसेच त्याच्या जीवनात शांतीही नसते. याउलट लक्ष्मीची कृपा असणारा मनुष्य अल्प अथवा अधिक पैसे असूनही ताणमुक्त आणि आनंदी जीवन जगतो. त्याला रात्रभर शांत झोप लागते. त्याच्या जीवनात लक्ष्मीकृपेचे एक समाधान असते आणि ते त्याच्या तोंडवळ्यावरही दिसते.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२९.४.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक