‘अलोपशिया एरियाटा’ अर्थात् चाई पडणे यावर उपचार !

वैद्य परीक्षित शेवडे

‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेता विल स्मिथ याने त्याच्या पत्नीवर विनोद केल्याने क्रिस रॉक याच्या कानशिलात लगावल्याची घटना अनेक दिवस चर्चेत राहिली. विलची पत्नी जेडा ही ‘अलोपशिया एरियाटा’ने ग्रस्त असल्याने तिने संपूर्ण टक्कल केले आहे.

‘अलोपशिया एरियाटा’ला आपण मराठीत ‘चाई पडणे’ असे म्हणतो. आयुर्वेदात याला ‘इंद्रलुप्त’ अशीही संज्ञा आढळते. शरिराची रोगप्रतिकारशक्ती न्यून असणे, हे या मागील प्रमुख कारण ! आयुर्वेदानुसार ‘कृमी’ हेही एक महत्त्वाचे कारण आहे. वेळेत निदान आणि आयुर्वेदाचे उपचार केल्यास या तक्रारीत उत्तम लाभ होतो. आयुर्वेदात जळू वा अन्य मार्गाने स्थानिक दूषित रक्त काढणे अर्थात् रक्तमोक्षण, रक्तधातूला गुणवत्तापूर्ण करणारी औषधे, बाह्यतः लावण्याचे लेप आणि मूलभूत पथ्यपालन यांच्या साहाय्याने हा त्रास नियंत्रणात आणता येऊ शकतो. पुढे काही काळ रसायन उपचार घेतल्याने अधिक लाभ होतो.

‘अलोपशिया एरियाटा’ अर्थात् चाई पडणे

या आजाराशी संबंधित काही मूलभूत पथ्यापथ्य – 

१. जेवण, झोप आणि व्यायाम नियमित असावे.
२. घरी शिजवलेले ताजे अन्नच सेवन करावे.
३. मांसाहार, लोणचे, चायनीज पदार्थ किंवा मसालेदार वा जळजळीत पदार्थ (विशेषतः विविध कालवणे, करी आदी) टाळावे.
४. शिळे अन्न, बेकरी उत्पादने, तसेच मशरूम टाळावे.
५. ऊन आणि वारा थेट अंगावर येऊ नये, याविषयी काळजी घ्यावी. (उदा. टोपी वापरणे, वातानुकूलन यंत्र वा पंखा यांच्या थेट कक्षेत न बसणे इत्यादी)

आपल्या जवळील शासन नोंदणीकृत वैद्यांचा सल्ला लवकरात लवकर घेतल्यास उत्तम उपचार होऊ शकतात. अन्यथा एखादा रोग, त्यावरील विनोद आणि त्यावरील थप्पड हा जगासाठी चर्चेचा विषय होऊ शकतो. आपण मात्र आपापल्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक आवश्यक !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली