हिजाब आंदोलन !

इराणमधील उग्र झालेले आंदोलन

गेले १० दिवस इराणमध्ये चालू असलेल्या हिजाब आंदोलनाला आता हळूहळू अन्य देशांतूनही पाठिंबा मिळत असल्याची वृत्ते येऊ लागली आहेत. तेथे महासा अमिनी ही मुलगी नातेवाइकांसमवेत जात असतांना हिजाब नीट न घातल्यावरून पोलिसांनी तिला अटक केली आणि नंतर पोलिसांच्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. हे निमित्त होऊन तेथे आंदोलन चालू झाले. केस सोडून आंदोलन करणार्‍या हदीस नझफी या २० वर्षीय इराणी तरुण मुलीला आंदोलन रोखणार्‍या पोलिसांनी गोळी घातल्याच्या घटनेनंतर आता तेथील आंदोलन उग्र झाले आहे. हिजाब घालण्याच्या शरियतसदृश कायद्याचे पालन करायला लावणारे इराणी सरकार आणि तेथील पोलीस एवढे निष्ठूर आहेत की, त्यांच्या गोळ्यांनी अन्य तब्बल ७६ जणांचाही बळी घेतला आहे, तसेच १ सहस्र २०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना सोडण्याची मागणीही आंदोलक करत आहेत. आंदोलकांनी पोलीस ठाणी आणि वाहने यांना आगी लावल्या आहेत. आता इराणमधील ८० शहरांत हे आंदोलन चालू आहे. ‘आमच्या मूलभूत अधिकारांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत; आता आमचा आवाज कुणी दाबू शकत नाही’, असे तेथील महिलांनी म्हटले आहे. हिजाब जाळून आणि केस कापून महिला हे आंदोलन करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील विरोधी पक्षाने या महिलांना पाठिंबा दिला आहे. तेथील सरकारचा कुर्द भागात इंटरनेट बंद करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. पोलीस लोकांच्या घरात घुसूनही आंदोलन दाबत आहेत. इराणमधील या आंदोलनाला कॅनडाने प्रतिसाद दिला आहे. इराक, ग्रीस, लंडन आणि फ्रान्स या देशांतही या महिलांना पाठिंबा देणारे आंदोलन चालू झाले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनांत पुरुषांचाही मोठा सहभाग आहे. अजून तरी मानवाधिकार संघटनांनी याविषयी भाष्य केलेले नाही; परंतु जगभरातील पुरुष आणि महिला यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांतून हा विषय उचलून धरला आहे. हे आंदोलन वाढले, तर इराणवर जगभरातूनही दबाव येण्याची चिन्हे नाकारता येऊ शकत नाहीत. ‘महिलांवर हिजाबची बळजोरी करू नये’, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. या संदर्भात अमेरिका इराणवर काही प्रतिबंध घालण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हिजाब जाळून आणि केस कापून महिलांचे आंदोलन !

मधल्या काही दशकांमध्ये इराणमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले होते. वर्ष १९८१ पासून येथे परत हिजाब अनिवार्य करण्यात आला. ७ वर्षांच्या मुलीनेही हिजाब घालण्याचा नियम इराणमध्ये आहे. काही देशांमध्ये महिलांचे ढोपर दिसले, तरी शिक्षा आहे. सौदी अरेबियात महिलांची इंचभरही त्वचा दिसण्यास अनुमती नाही. इस्लामी आणि गैरइस्लामी अशा जगातील सर्वच देशांत अनेक प्रकारचे हिजाब आहेत.

‘जवळपास निम्मी लोकसंख्या असणार्‍या महिलांना प्रतिबंधित करून सरकार संपूर्ण समाजावर अधिकार गाजवत आहे. त्यांना वाटते, ‘महिलांना मोकळीक दिली, तर ‘इस्लामिक रिपब्लिक’ धोक्यात येईल’, असे इराणमधील महिलांनी म्हटले आहे. इराणची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नाही. अमेरिकेचे निर्बंध त्यावर सतत असतात. कदाचित इराणवरील अमेरिकेचा दबाव वाढण्यास हे आंदोलनही कारणीभूत ठरू शकते. इराणचे सध्याचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या विरोधातील रागही या आंदोलनात स्पष्टपणे समोर येत आहे. कुणी सांगावे, कदाचित इराणमधील हिजाब आंदोलनाचे निमित्त इराणमधील सत्तांतरालाही उद्या कारणीभूत ठरू शकते. कदाचित् ‘या आंदोलनामुळे इराणी महिला पुष्कळ काही मिळवतील’, असेही नाही; परंतु या आंदोलनाचा इतिहास ‘एक क्रांतीकारी आंदोलन’ म्हणून नक्कीच नोंद घेईल. या आंदोलनात बळी गेलेल्या महिलांचे बलीदान तसे व्यर्थ जाणार नाही. त्यातून आंदोलनाची आग भडकत आहे आणि ती आग अन्यायी इस्लामी नियमांना काही प्रमाणात तरी जाळल्याविना रहाणार नाही.

भारतातील हिजाबप्रेमी काय करणार ?

एवढे दिवस इराणमध्ये आंदोलन चालू असूनही भारतातील मुसलमानधार्जिण्यांची बोलती बंद आहे. महाविद्यालयात हिजाब घालण्यास बंदी केल्याचे निमित्त करून कर्नाटकात धर्मांध मुसलमानांनी जो काही गोंधळ घातला, त्या ढोंगीपणाला तर सीमाच नव्हती आणि नंतर अन्य राज्यांतही त्याचे पडसाद उमटले. भारतात मागील २ दशकांतही ज्या मुसलमान महिला बुरखा घालत नव्हत्या, त्याही अलीकडच्या काळात बुरखा घातलेल्या दिसू लागल्या. आता इराणसारख्या इस्लामी देशातच हिजाबला एवढा विरोध होत असतांना भारतातील कट्टर मुसलमान त्याविषयी काहीही प्रतिक्रिया देत नाहीत आणि प्रत्येक वेळी त्यांची तळी उचलून धरणारे तथाकथित निधर्मीही काही बोलतांना दिसत नाहीत. या आंदोलनाचे लोण जगभर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसे झाल्यास कदाचित् जगभरात हिजाबविरोधी वातावरण निर्माण होईल. तरीही भारतात धर्मांध मुसलमान आणि त्यांचे प्रेमी हे त्यांची धर्मांधता जोपासत किती दिवस ‘हिजाब प्रकरण’ चालू ठेवणार आहेत ? जगभरात उलथापालथ होत असतांना भारतात दंगे करण्यासाठी निमित्त शोधणार्‍यांची बाजू घेणार्‍यांचे डोळे उघडणार आहेत का ? हा प्रश्न आहे. एकीकडे हिजाबसाठी बळजोरी आणि दुसरीकडे ‘हलाला’ (तलाक दिल्यावर महिलांची शुद्धी करण्यासाठी त्यांना अन्य पुरुषांशी संबंध ठेवावे लागणे) सारखी भयंकर पद्धत अशी अनाकलनीय विकृती यांच्याकडे आहे. सर्वाेच्च न्यायालयात कर्नाटकातील हिजाब प्रकरण चालू आहे. सरकारी अधिवक्त्यांनी येथे स्पष्ट सांगितले आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या सदस्यांनी विद्यार्थिनींना महाविद्यालयात हिजाब घालण्याच्या संदर्भात भडकावले आहे. हिजाबची बळजोरी करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची वेळ भारत सरकारने आणली आहे; परंतु हिजाबवर बंदी घालण्याचा विचार भारतातील मुसलमान करतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे !

जगभरातील हिजाबविरोधी आंदोलनातून भारतातील धर्मांध मुसलमान धडा घेणार का ?