चंद्रविला धर्मादाय संस्थेने प्रत्येकी ५० सहस्र रुपयांत ३० ‘लव्ह जिहाद’ निकाह लावून दिले !

  • अमरावती येथील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी ४ पोलीस अधिकार्‍यांकडून दिरंगाई
  • संस्थेविरोधात गुन्हा नोंद
  • पोलिसांकडून मुख्य आरोपी मुसलमान तरुणाला अटक करण्यास टाळाटाळ !

अमरावती, ४ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील धारणी येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात अधिवक्ता महेश देशमुख यांच्या ‘चंद्रविला धर्मादाय ट्रस्ट’ या संस्थेवर स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे निकाह लावून दिल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. या संस्थेने ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी एकूण ३० निकाह लावून दिले असून प्रत्येक निकाहासाठी ५० सहस्र रुपये घेतले आहेत. या प्रकरणी ४ पोलीस अधिकार्‍यांकडून कारवाई करण्यात दिरंगाई झाली आहे, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ४ सप्टेंबर या दिवशी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून मुख्य मुसलमान आरोपीला पोलिसांनी संरक्षण देण्याऐवजी त्याला अटक करावी, अशी आग्रहाची मागणी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

संस्थेला पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईसाठी गृहमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवणार !

अमरावती जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’चे मोठे रॅकेट सक्रीय असल्याने हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. धारणी येथे घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी येथील पोलीस ठाणेदार बेलखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोहर, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, तसेच शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ४ पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी डॉ. बोंडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहेत. या संदर्भात डॉ. बोंडे यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना संस्थेकडून करत असलेल्या अवैध गोष्टींची वस्तूस्थिती सांगितली.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणी शाळा आणि महाविद्यालये येथे मुलींचे समुपदेश करण्यात येणार !

शाळा आणि महाविद्यालय येथे समुपदेशनाची आवश्यकता असून भाजप, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच समविचारी संघटनांचे साहाय्य घेऊन जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांतील मुलींचे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी केले आहे.

‘चंद्रविला धर्मादाय संस्थे’ला विदेशातून निधी मिळत असावा ! – शिवराय कुळकर्णी, प्रवक्ते, भाजप

भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी म्हणाले, ‘‘गेल्या १० वर्षांपासून या ‘चंद्रविला संस्थे’ने बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक ‘लव्ह जिहाद’सारखे प्रेमविवाह लावून दिले आहेत. अशा विवाहांसाठी ‘चंद्रविला संस्थे’ला विदेशातून निधी मिळत असावा. तिच्या कागदपत्रांची कसून पडताळणी केली जावी.’’

बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘चंद्रविला धर्मादाय संस्थे’ने निकाह लावला, प्रमाणपत्रावर काझीऐवजी गवंडी कामगाराची स्वाक्षरी !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले, ‘‘मुस्लिम पर्सनल लॉ’ (मुस्लिम शरीयत कायदा)प्रमाणे निकाह लावला, तरी त्याच्यावर मेहरची (निकाहाच्या वेळी वधूच्या पित्याला देण्यात येणारे पैसे) रक्कम लिहावी लागते. ते बंधनकारक आहे, तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काझी अधिकृत असला पाहिजे; मात्र विवाह प्रमाणपत्रावर काझी यांची स्वाक्षरी नसून त्यावर चक्क एका गवंडी कामगाराची स्वाक्षरी आहे. हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे मी या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. अशा पद्धतीने विवाह लावून देणारा आरोपी अधिवक्ता महेश देशमुख याला अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महेश याने अशा पद्धतीने अनेक विवाह लावून दिले आहेत. याविषयी मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. महेश देशमुख यांना कह्यात घेऊन संस्थेच्या संपूर्ण कागदपत्रांची चौकशी करून या प्रकरणाची पाळमुळे खोदून काढावी, अशी मागणी मी केली आहे.’’