पंजाबमध्ये ५ मासांत १३५ भ्रष्ट अधिकार्‍यांना अटक

चंडीगड – पंजाबमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील ५ मासांमध्ये १३५ सरकारी अधिकार्‍यांसह एकूण २०० जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याच्या दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार लाच घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १३५ अधिकार्‍यांपैकी २५ राजपत्रित (क्लास वन) अधिकारी आहेत. या प्रकरणी आतापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आ.ए.एस्.पदावरील) १ अधिकारी आणि ३० पोलीस अधिकार्‍यांचाही समावेश आहे. पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्याने भ्रष्टाचारविरोधी अभियान हाती घेतले आहे. याच अभियानाच्या अंतर्गत भ्रष्टाचाराचा आरोप असलेले विद्यमान आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना पदच्युत करून त्यांना अटक करण्यात आली होती, तसेच तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री असलेले साधूसिंह धर्मसोत यांनाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकार्‍यांची संख्या एवढी असेल, तर अटक न झालेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा ! प्रशासन भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाल्याचे हे द्योतक आहे !