पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वांमध्ये देशप्रेम निर्माण होण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले. प्रत्येक राष्ट्रप्रेमीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वत:चे घर किंवा आस्थापन येथे ‘तिरंगा’ फडकावला. या अभियानाच्या निमित्ताने कोट्यवधींनी स्वत:च्या घरावर ‘तिरंगा’ लावून एकप्रकारे राष्ट्रप्रेम व्यक्त केले आणि देशाप्रतीचा अभिमान उंचावण्याचा प्रयत्न केला. असे असले, तरी या निमित्ताने राष्ट्रप्रेमासमवेत वाईट वृत्तींनीही डोके वर काढल्याचे समोर आले. हे अभियान विशिष्ट दिवसांपुरते मर्यादित न ठेवता ‘देशभक्तीची भावना’ प्रत्येकाने आमरण जागृत ठेवायची आहे. या अभियानाकडे कोणत्या दृष्टीने पहायला हवे ? हे जाणून घेऊ.
उद्देश
‘हर घर तिरंगा’ हे अभियान लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणारे आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे अन् राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून कार्य करणारे आहे. या अभियानामुळे खर्या राष्ट्रप्रेमीच्या मनात देशप्रेमाविषयी एक नवी प्रेरणा निर्माण झाली. क्रांतीकारकांच्या बलीदानाची आठवण होऊन तिरंगा लावतांना आणि प्रत्येकाच्या घरावर तो फडकत असलेला पहातांना प्रत्येकाचा उर देशप्रेमाने नक्कीच भरून आला असेल !
भारतामध्ये राहून वैर वृत्ती बाळगणारे राष्ट्रद्वेषी !
‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या माध्यमातून काही जणांनी ‘तिरंगा लावण्याची काही आवश्यकता नाही’, असे मत व्यक्त करून या अभियानाला विरोध केला. काही जणांनी ‘निशान साहिब’ (शिखांचा ध्वज) लावा’, असे आवाहन केले. कानपूर येथे तर राष्ट्रध्वजावर मशीद, चंद्र आणि तारा रेखाटून राष्ट्रध्वजाचा अवमान केला. ‘अशा राष्ट्रद्वेष्ट्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी’, असेच प्रत्येक देशप्रेमीला वाटते.
निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारी आस्थापने !
महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ठेकेदारांकडून लाखोंच्या संख्येने राष्ट्रध्वज सदोष आणि दर्जाहीन बनवण्यात आले. महापालिकांनी असे राष्ट्रध्वज त्या त्या ठेकेदारांना परत पाठवले. राष्ट्रध्वज म्हणजे देशाचा सन्मान आहे. तो सन्मान प्रत्येकाने जपणे, हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. असे असतांना काँग्रेसने पेरलेली भ्रष्टाचाराची कीड या ठिकाणीही डोके वर काढतांना दिसते.
‘हर घर तिरंगा’ अभियान अविरतपणे राबवणे आवश्यक !
सध्याच्या स्थितीत देशामध्येच ‘इंग्रजवृत्ती’चे म्हणजेच देशाला लुबाडणारे लोक आहेत, त्यांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा ‘हर घर तिरंगा’ या अभियानातून मनात जागृत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:मध्ये देशप्रेम निर्माण करण्याचे दायित्व घ्यायला हवे.
राष्ट्रउभारणीचा संकल्प करूया !
देशाला सध्याच्या बिकट स्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने ‘मी राष्ट्रासाठी पूरक होणार’, असा संकल्प करणे आवश्यक आहे. यासाठी ‘मी कोणतेच चुकीचे काम करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही’, असे ठरवावे. प्रत्येकाने स्वत:ची वृत्ती पालटण्याचा प्रयत्न केल्यासच खर्या अर्थाने राष्ट्रउभारणी होईल. धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे साधना केल्यास वृत्ती आपोआपच सात्त्विक होईल आणि देश महासत्ता बनण्याकडे मार्गक्रमण करील, हे नक्की !
– वैद्या (सुश्री [कु.]) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल. (१२.८.२०२२)
कृतीशील देशप्रेम जागृत करा !भारताकडे आध्यात्मिक सामर्थ्य आहे. त्याच्या बळावर तो पुन्हा महासत्ता बनणार, हे नक्की ! त्यासाठी आवश्यकता आहे, प्रत्येक भारतियाने स्वतःमध्ये देशप्रेम निर्माण करण्याची ! यासाठी स्वत:चे देशाप्रती असलेले कर्तव्य समजून घेणे आवश्यक आहे. ‘मी कसा वागत आहे ?’, त्यानुसार माझी कृती देशासाठी हानीकारक आहे कि लाभकारक आहे, हे ठरते. सामान्य व्यक्तीपासून ते देशाचे नेतृत्व करणार्या सर्वांनीच देशाप्रतीच्या स्वत:च्या दायित्वाचे भान स्वतःमध्ये निर्माण करायला हवे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आणि गृहिणींपासून ते नोकरी करणार्या प्रत्येक स्त्रीने देशप्रेमाचे व्रत घेणे आवश्यक आहे. |