शेजारील देश काळ्या सूचीतील आतंकवाद्यांचा ते ‘सरकारी अतिथी’ असल्याप्रमाणे सत्कार करतो ! – भारत

दाऊदला आश्रय देणार्‍या पाकचे नाव न घेता संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची टीका

रुचिरा कम्बोज

न्यूयॉर्क – ‘आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणार्‍या आणि संयुक्त राष्ट्रांकडून काळ्या सूचीत टाकण्यात आलेल्या आतंकवाद्यांचा शेजारी देश ‘सरकारी अतिथी’ असल्याप्रमाणे सत्कार करतो’, असा भारताला अनुभव आहे, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या राजदूत रुचिरा कम्बोज यांनी केले. कम्बोज यांचा कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्यावर रोख होता. ‘जगातील प्रत्येक देशावर आतंकवादाचे सावट असतांना अशा प्रकारच्या ढोंगीपणाच्या विरोधात संघटितपणे लढण्याची आवश्यकता आहे’, असेही त्या पाकचे नाव न घेता म्हणाल्या.

१. चीनच्या अध्यक्षतेखाली ‘आतंकवादी कृत्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण यांना धोका’, या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ९ ऑगस्ट या दिवशी झालेल्या बैठकीत कम्बोज बोलत होत्या.

२. त्या पुढे म्हणाल्या की, आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

वर्ष १९९३ मधील मुंबई बाँबस्फोट प्रकरण आणि अन्य अनेक प्रकरणे यांमध्ये आरोपी असलेला दाऊद इब्राहिम हा गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आहे. पाकने ऑगस्ट २०२० मध्ये दाऊद त्याच्या देशात असल्याचे प्रथमच म्हटले होते, तर वर्ष २००३ मध्ये अमेरिकेने त्याचे नाव जागतिक आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये समाविष्ट केले होते.