(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे काश्मीर प्रश्‍न सोडवावा !’ – चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग

बीजिंग – भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे काश्मीर प्रश्‍न शांततेने सोडवावा, असा फुकाचा सल्ला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी दिला. ‘काश्मीरच्या सूत्रावर चीनची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी संयम अन् समजूतदारपणा दाखवावा, तसेच परिस्थिती बिघडेल किंवा तणाव वाढेल अशी कोणतीही कारवाई करू नये. आजूबाजूच्या प्रदेशांत शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा करून वाद सोडवावा’, असेही चीनने म्हटले आहे.

चीनला भारताचे प्रत्युत्तर

‘काश्मीरशी संबंधित प्रश्‍न हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे’, हे आम्ही अनेकदा स्पष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधीही म्हटले होते की, चीनसह इतर कोणत्याही देशांना यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत अन्य देशांच्या अंतर्गत प्रश्‍नांवर जाहीर वक्तव्ये करण्याचेही टाळतो, हे अन्य देशांनी लक्षात घ्यावे’, अशा शब्दांत भारताने चीनला प्रत्युत्तर दिले आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसण्याऐवजी चीनने त्याच्या देशात भेडसावणार्‍या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे ! भारतानेही आता चीनला शाब्दिक समज देण्यापेक्षा त्याला समजेल अशा भाषेत उत्तर देणे अपेक्षित आहे !