मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक खासदारांची अमित शहा यांच्याकडे मागणी
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक खासदारांनी २ ऑगस्टला नवी देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली. या वेळी खासदार कृपाल तुमाने, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार राजेंद्र गावित आदी उपस्थित होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, राहुल शेवाळेंच्या नेतृत्वात शिंदे गटातील खासदार अमित शाहांच्या भेटीला https://t.co/TrvFYqC2a3 @shewale_rahul @mieknathshinde @ShivSena @AUThackeray #rahulshewale #AmitShah #EknathShinde #Marathi #MarathiLanguage #AdityaThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2022
या वेळी खासदारांच्या वतीने अमित शहा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्यशासनाने वर्ष २०१२ मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल वर्ष २०१३ मध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे सादर केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आवश्यक निकषांमध्ये मराठी भाषेचा समावेश होतो. याविषयीची कागदपत्रे समितीने पुराव्यांनिशी सादर केली आहेत. हा अहवाल सादर करून, तसेच याविषयी सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या वतीने आतापर्यंत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम् आणि उडिया या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.