‘२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव झाला. या ‘ऑनलाईन’ जन्मोत्सव सोहळ्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या यापूर्वी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याच्या ध्वनीचित्र-चकत्या दाखवण्यात आल्या होत्या. महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्रीमन्नारायण यांच्या रूपात साधकांना दिलेल्या दर्शनसोहळ्यांच्या त्या ध्वनीचित्र-चकत्या होत्या. त्यांपैकी एकात महर्षींच्या आज्ञेनेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झोपाळ्यावर बसवून त्यांचा ‘झुलोत्सव’ (देवाची मूर्ती झोपाळ्यावर ठेवून भक्तांनी झोका देणे. येथे श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झोपाळ्यावर बसवून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी झोका देणे) साजरा करण्यात आला. ते पहात असतांना पू. उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ध्यानावस्थेत दिसून त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या निर्गुण रूपाचे दर्शन होणे
‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) झुलोत्सवाच्या वेळी मला त्यांच्या सगुण-निर्गुण रूपाचे दर्शन झाले. साक्षात् श्रीविष्णुस्वरूप परमेश्वराला श्री भूदेवीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीदेवीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ झोका देत होत्या. त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ध्यानावस्थेत असून त्या प.पू. गुरुदेवांचे निर्गुण रूप असलेल्या तेजस्वी प्रकाशाचे दर्शन घेत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्याकडे पहातांना मला प.पू. गुरुदेवांच्या निर्गुण रूपाचे दर्शन झाले.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) मुकुल गाडगीळ अखंड भावावस्थेत दिसून प.पू. गुरुदेवांच्या निर्गुण-सगुण रूपाचे दर्शन होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ अखंड भावावस्थेत असून त्या शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेल्या श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेवांचे दर्शन घेत आहेत’, असे मला जाणवले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे पहातांना मला प.पू. गुरुदेवांच्या निर्गुण-सगुण रूपाचे दर्शन झाले.
त्या वेळी दोन्ही सद्गुरु मातांप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. प्रीतीस्वरूप प.पू. गुरुमाऊलींच्या रूपात असणार्या साक्षात् परमेश्वराची थोरवी समजून घेण्याचे प्रयत्न करणेही आमच्यासारख्या सामान्य नश्वरांना शक्य नाही. दोन्ही सद्गुरु मातांच्या वात्सल्याच्या वर्षावामुळेच आम्हाला प.पू. गुरुदेवांच्या रूपातील परमेश्वरतत्त्वाची अनुभूती घेता येत आहे.’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (१०.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |