राज्यघटना धर्मविरोधी आहे का ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात केलेल्या श्री सत्यनारायण पूजेच्या विरोधात ठाणे जिल्हा न्यायालयात एका व्यक्तीने तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांचे हे कृत्य राज्यघटनाविरोधी, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे; परंतु राज्यघटना ना धर्मविरोधी आहे, ना श्रद्धाविरोधी ! त्यामुळे यामध्ये नेमका कोणता गुन्हा होतो ? हे न्यायालयच सांगू शकेल. राज्यघटनेने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. राज्यघटनेने कुणालाही धर्मानुसार आचरण करण्यास नाकारलेले नाही. शासकीय कार्यालयात विविध धर्माचे नागरिक एकत्र असू शकतात. त्यामुळे कोणता वाद निर्माण होऊ नये, तसेच धार्मिक गोष्टींचे अवडंबर होऊ नये, यांसाठी शासकीय कार्यालयात याविषयीच्या मार्गदर्शक सूचना अवश्य असाव्यात; परंतु ऊठसूट कुणी हिंदूंच्या धार्मिक विधींना अंधश्रद्धा म्हणून राज्यघटनेचा सोयीनुसार उल्लेख करत असेल, तर हिंदूंनी घटनाविरोधी कृत्यांचा पाढा त्यांच्या पुढे वाचायला हवा. मुख्यमंत्री कार्यालयातील श्री सत्यनारायणाच्या पूजेला घटनाविरोधी ठरवायचे; परंतु कायदा-सुव्यवस्थेला फाटा देऊन सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या नमाजपठणाविषयी गप्प रहायचे, हे कसले घटनाप्रेम ? ‘ज्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील श्री सत्यनारायणाची आरती ऐकू येते, त्यांना सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही चालू असलेल्या मशिदींवरील भोंग्यांचा आवाज का ऐकू येत नाही ?’ हा प्रश्न हिंदूंनी विचारायला हवा.

गेल्या काही वर्षांत हिंदु धर्मातील प्रथा-परंपरांनुसार आचरण करणे, हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याची आवई उठवली जात आहे. हिंदूंना कायद्याच्या चौकटीत अडकवून त्यांना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न पुरो(अधो)गामी मंडळी करत आहेत. सोयीप्रमाणे ‘धर्मनिरपेक्षता’, ‘राज्यघटनाविरोधी’ आदी शब्दांचा भडिमार करणार्‍या पुरोगाम्यांना राज्यघटनाविरोधी कारवाया कोणत्या आहेत ? हे हिंदूंनी सांगणे आवश्यक आहे.

‘सेक्युलॅरिझम्’ (धर्मनिरपेक्षता) हाच मुळात घटनाद्रोह !

वर्ष १९७६ मध्ये देशात आणीबाणी लागू असतांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ४२ वी घटनादुरुस्ती करून राज्यघटनेत ‘सेक्युलॅरिझम्’ शब्द घुसडला. ‘संसदेत दोन तृतीयांश बहुमत सिद्ध न करता बळजोरीने राज्यघटनेत शब्द घुसडणे’, हेच मुळात घटनाविरोधी कृत्य आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: राज्यघटनेत ‘सेक्युलॅरिझम्’ या शब्दाचा समावेश करण्यास विरोध दर्शवला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही या शब्दाला विरोध केला होता. कार्यालयात पूजा केल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कृती राज्यघटनाविरोधी ठरत असेल, तर आणीबाणीच्या काळात लोकशाही धाब्यावर बसवून राज्यघटनेत ‘सेक्युलॅरिझम्’ शब्द घुसडणार्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घटनाद्रोहाविषयीही पुरोगामी का बोलत नाहीत ? बरे ‘राज्यघटनेतील ‘सेक्युलॅरिझम्’ म्हणजे तथाकथित धर्मनिरपेक्षता पुरोगामी मंडळींनी मान्य केली’, असे म्हणावे, तर त्यालाही काही अर्थ नाही. धर्मनिरपेक्षता म्हटले, तर किमान प्रत्येक धर्माप्रती समानता असायला हवी; परंतु राज्यघटनेत हा शब्द घुसडून धर्माच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ आणि ‘बहुसंख्यांक’ हे भाग पाडण्यात आले. आजही धर्माच्या नावाने देशात मुसलमानांना सोयीसुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत ‘धर्मनिरपेक्षता’ राहिली नसून धर्माच्या आधारे मुसलमानांचे लांगूलचालन चालू आहे. राज्यघटनेचा अवमान करून चालू असलेली ही कृत्ये पुरोगामी मंडळींना दिसत नसतील, तर त्यांचे राज्यघटनेवरील प्रेम हिंदूंना विरोध करण्यासाठीच उफाळून येते, असे म्हणावे लागेल.

बेगड्या पुरोगामित्वाचे ढोंग बंद करावे !

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे आघाडी सरकार असतांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्यात आला. हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरोधात असला, तरी त्या आडून हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालण्याचा प्रकार चालू आहे. सत्यनारायणाच्या पूजेला अंधश्रद्धा म्हणणारे अन्य धर्मियांच्या विधीला कधीही अंधश्रद्धा ठरवण्याचे धारिष्ट्य करत नाहीत. सार्वजनिक जीवनात ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक विधी यांवर टीका करायची; मात्र वैयक्तिक जीवनात ज्योतिषशास्त्राचा आधार घेणारे राजकीय नेते अनेक आहेत. सर्वपक्षीय नेते मंडळींच्या हातात कितीतरी गंडेदोरे असतात. हातात गंडेदोरे बांधायचे, बोटांत ग्रहदोष दूर करणार्‍या अंगठ्या घालायच्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांत मात्र ज्योतिषावर टीका करायची, असा दुटप्पीपणा कशासाठी ? केवळ स्वत:चे बेगडी पुरोगामित्व जपण्यासाठी चाललेले हे ढोंग सर्वपक्षीय नेतेमंडळींनी बंद करायला हवे. राज्यघटनेत ‘सेक्युलॅरिझम्’ शब्द घुसडणे असो, सत्यनारायणाच्या पूजेला विरोध असो किंवा सार्वजनिक जीवनात हिंदूंच्या धर्मशास्त्राचे महत्त्व नाकारणे असो, हे सर्व हिंदु धर्माला कालबाह्य ठरवण्याचे प्रयत्न आहेत.

हिंदु धर्मावर टीका करणारी ही मंडळी शिक्षित आहेत; परंतु धर्मशिक्षित नाहीत. हिंदु धर्मावर टीका करणे, म्हणजे त्यांना पुरोगामित्व वाटते. राज्यघटनेचा सोयीनुसार उपयोग करून ही मंडळी केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करत आहेत. याला हिंदूंनी बळी पडू नये. पुरोगामी मंडळी राज्यघटनेचा सोयीनुसार उपयोग करून हिंदु धर्माला विरोध करत असतील, तर हिंदूंनीही विश्वकल्याण साधेल, असे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

शासकीय कार्यालयांत सत्यनारायण पूजेला विरोध करणारे सार्वजनिक ठिकाणच्या नमाजपठणाविषयी गप्प का ?