काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती ! – योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे क्रांतीकारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि कवी यांचा अपमान करण्याची काँग्रेसने कोणतीही संधी सोडली नाही. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सावरकर यांच्याहून कुणीही मोठे नव्हते. स्वातंत्र्यानंतर सावरकर यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो दिला गेला नाही. जर काँग्रेसने सावरकर यांचे म्हणणे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : जे भारताची फाळणी रोखू शकले असते आणि त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीकोन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. ‘पाकिस्तान जाईल किंवा येईल; पण भारत कायम राहील’, असे सावरकर म्हणाले होते’, असेही त्यांनी नमूद केले. ‘हिंदुत्व’ हा शब्द वीर सावरकर यांनीच दिल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.