यासीन मलिकची स्वीकृती !

जम्मू-काश्मीर येथील फुटीरतावादी आणि भारतविरोधी यासीन मलिक याने नुकतीच एन्.आय.ए.च्या न्यायालयात ‘मी पाकिस्तानच्या सांगण्यावरून काश्मीर येथील तरुणांना चिथावणी द्यायचो. यासाठी लागणारा पैसा आणि देशविरोधी कारवाया करण्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी मी जगभरात ‘नेटवर्क’ (यंत्रणा) सिद्ध केले होते’, अशी स्वीकृती दिली आहे. या वेळी त्याने त्याच्यावरील सर्व गुन्ह्यांची संमती दिली आहे. यासीन मलिकवर कलम १६ (आतंकवाद कायदा), कलम १७ (आतंकवादासाठी निधी गोळा करणे), कलम १८ (आतंकवादाचा कट रचणे), कलम २० (आतंकवादी टोळीचा सदस्य असणे) अशा विविध गंभीर आणि देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हे नोंद आहेत. या आरोपांना यासीन मलिकने वरच्या न्यायालयात आव्हान न देण्याचे ठरवले आहे. त्याने जवळपास ३२ वर्षांनंतर स्वत:च्या गुन्ह्यांची स्वीकृती दिली आहे. एवढ्या वर्षांच्या कालावधीत त्याची पाठराखण करणारे काँग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह अन् काँग्रेस हे मात्र तोंडघशी पडले आहेत. यासीन मलिकवर वर्ष १९९० मध्ये काश्मीर येथे हवाईदलाच्या ४ अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा आरोप आहे. आतंकवादी हाफीज सईद याच्या समवेतच्या त्याच्या गाठीभेटी, तत्कालीन गृहमंत्री महंमद सईद यांच्या मुलीचे अपहरण असेही अनेक आरोप त्याच्यावर आहेत. यासीन मलिकने भारत सरकारला ‘माझ्यावर कारवाई करून दाखवा’, असे आव्हानही अनेक वेळा केले आहे.

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड घडवले, त्यांच्या कुटुंबियांवर अनन्वित अत्याचार केले. काश्मीर खोऱ्यातील आतंकवाद्यांचा हा नंगानाच ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामधून काही प्रमाणात उघड झाला. या फुटीरतावाद्यांनी आतंकवादी आणि त्यांची कृत्ये यांचे नेहमी वैचारिक समर्थन केले. परिणामी आतंकवादाला वैचारिक संरक्षण मिळाले. या फुटीरतावाद्यांची देशविरोधी कृत्ये माहिती असूनही काँग्रेसने त्यांना कुरवाळल्यामुळे ते डोईजड झाले. काश्मीर मधील निवडणुकांमध्ये काही वेळा या फुटीरतावादी गटांसमवेत युती करण्याची नामुष्कीही मोठ्या राजकीय पक्षांवर आली. यासीन मलिकच्या स्वीकृतीमुळे केवळ काश्मीरमधीलच नव्हे, तर देशात मुसलमानांची माथी भडकावण्याच्या मागे पाक कसा कार्यरत आहे ? हे लक्षात येते. पाकिस्तान भारतातील धर्मांधांना भारताच्या विरोधातच उभा करून त्यांच्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. आताही सरकारी कर्मचारी राहुल भट यांची हत्या आतंकवाद्यांनी केली. भट यांच्या पत्नीने ‘राहुल यांची माहिती त्यांच्या सहकाऱ्याने आतंकवाद्यांना दिली’, असा आरोप केला आहे. पाक एकही गोळी खर्च न करता भारतातीलच धर्मांधांच्या माध्यमातून हिंदूंना वेचून मारत आहे. त्यामुळे केवळ पाकमधून प्रशिक्षण घेऊन येणाऱ्या आतंकवाद्यांना मारून न थांबता त्यांचा जनक असलेल्या पाकवरच आक्रमण करून त्याला नेस्तनाबूत करणे, हाच एकमेव उपाय आहे.

आतंकवादी बिट्टा कराटेने ‘२० हून अधिक हिंदूंच्या हत्या केल्या’, अशी निलाजरी स्वीकृती जाहीररित्या दिली होती. यातून फुटीरतावादी, आतंकवादी यांना कुठलेही भय नाही, हे लक्षात येते. ‘भारतात आतंकवादी कृत्य केल्यास जन्माची अद्दल घडेल’, अशा शिक्षेची तरतूद केल्यासच त्यांच्यात भय निर्माण होऊ शकते. यासाठी पाकवर सैनिकी कारवाई करण्याचे आणि आतंकवाद्यांना साहाय्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे पाऊल सरकारने तात्काळ उचलावे, ही अपेक्षा !

आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना विनाविलंब मृत्यूदंडाच्या शिक्षेची व्यवस्था केव्हा होणार ?