पुन्हा ताजमहाल !

ताजमहालवरून पुन्हा एकदा न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली असून या वेळी ‘या प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावा’, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘ताजमहाल हिंदूंचा कि मुसलमानांचा’ असा सातत्याने वाद होत असल्याने समाजामध्ये दुही निर्माण झाली आहे. ती नष्ट होण्यासाठी ताजमहालमधील बंद असलेल्या २२ खोल्या उघडून त्यांची तपासणी करून सत्य काय ते जनतेसमोर ठेवा’, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ही मागणी चुकीची तर नाहीच, उलट ‘हा प्रश्न इतकी वर्षे चिघळत का ठेवण्यात आला ?’, हा प्रश्न आहे. केवळ ताजमहालच नव्हे, तर देशातील अनेक वास्तू अशा आहेत की, ज्यांचे मूळ वास्तव वेगळे आहे आणि ते जनतेसमोर येणे आवश्यक आहे; कारण हा हिंदु संस्कृतीचा इतिहास आहे. वास्तूशास्त्र, शिल्पकला यांचा हा गौरवशाली इतिहास आहे. सध्या तो भारतात आलेल्या मोगल आक्रमकांच्या नावावर जाणीवपूर्वक खपवला गेला आहे. तो उघड करून सत्य माहिती जगासमोर येणे आवश्यक आहे. यातून केवळ इतिहासच समोर येणार नाही, तर एक अभिमानाची भावना हिंदूंच्या मनात निर्माण होईल आणि त्यातून ‘आपले पूर्वज किती महान होते’, हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. देशात हिंदूंच्या अशा असंख्य संरचना आहेत, त्यांना जागतिक दर्जा प्राप्त आहे. यात बहुसंख्य मंदिरेच आहेत. अजिंठा, एलोरा किंवा खजुराहो, तसेच मंदिरे यांची वास्तूकला आणि शिल्पकला यांना जगात तोड नाही. आजही त्यांचा अभ्यास केला जातो. ‘ही रचना कशी काय करण्यात आली असेल ?’, हा प्रश्न अद्यापही जागतिक स्तरावर तज्ञांना पडलेला आहे. वेरूळची लेणी तर उभ्या डोंगरात वरून खोदून निर्माण केली आहे. जगात अशी वास्तू कुठेही नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सध्या ज्या काही शेष वास्तू आहेत, त्या तुलनेत पुष्कळच अल्प आहेत. मोगलांच्या आक्रमणानंतर पुढील ८०० वर्षांत देशातील अशी सहस्रो संरचना त्यांच्याकडून पाडण्यात आल्या, तर त्यांनी काही स्वतःच्या नावावर खपवल्या. पुढे इंग्रजांना यामागील खरा इतिहास ठाऊक झाल्यानंतरही त्यांनी मोगलांनी प्रचलित केलेला इतिहास कायम ठेवून हिंदु आणि मुसलमान यांच्यात द्वेष धगधगत ठेवला. मोगलांनी पाडलेल्या वास्तूंमध्ये सोमनाथाचे मंदिर, अयोध्येतील श्रीराममंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मंदिर, काशीचे विश्वनाथ मंदिर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘श्रीराममंदिर आणि कृष्णमंदिर पुष्कळच भव्यदिव्य होते’, असे म्हटले जाते. ज्या वास्तू मोगलांनी पाडल्या नाहीत आणि स्वतःच्या नावावर खपवल्या, त्यात ताजमहाल, कुतूबमिनार आदींचा समावेश आहे.

मोगल हे मुळात आखाती देशांतून म्हणजे वाळवंटातून आले होते. इस्लामचा जन्मच मुळी ६ व्या शतकात झाला. त्यांच्याकडे शिल्पकला नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. जर असे काही असते, तर त्यांनी त्यांच्या देशांत अशा प्रकारच्या वास्तू निर्माण केल्या असत्या; मात्र अशी कोणतीही वास्तू तेथे अस्तित्वात नाही आणि पूर्वीही नव्हती. ‘अशांनी कुतूबमिनार, ताजमहाल बनवले’, असे म्हणणे हास्यास्पदच म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांचे खरे स्वरूप उघड करणे आता अत्यावश्यक झाले आहे.

केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा !

वर्ष २०१७ मध्ये पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी आगऱ्याच्या न्यायालयात याचिका प्रविष्ट करून ‘ताजमहाल हे शिवमंदिर आहे’, असे म्हटले होते आणि भारतीय पुरातत्व विभागाला पक्षकार करण्यात आले होते. त्यावर पुरातत्व विभागाने ‘ताजमहाल हा मोगल बादशहा शहाजहां याची पत्नी मुमताज हिची कबर असलेली जागा आहे’, असे सांगितले होते. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली होती. या याचिकेत ताजमहालच्या तळाला असलेल्या खोल्या उघडून तेथील माहिती घेण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र ती नाकारण्यात आली. आताही याच सूत्रावरून याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर न्यायालय आता काय निर्णय घेणार, हे येणारा काळच ठरवेल; मात्र ‘अशी मागणी करावीच लागू नये’, असे हिंदूंना वाटत आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरच मोगल आणि इंग्रज यांनी सांगितलेला इतिहास पडताळून खरा इतिहास समोर आणण्याची आवश्यकता होती. हिंदूंच्या ज्या काही वास्तू आहेत किंवा त्यांच्यावर मोगलांनी जे काही अतिक्रमण केले आहे, ते ऐतिहासिक कागदपत्रांद्वारे उघड करणे आवश्यक होते; मात्र काँग्रेस सरकारच्या काळात अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळे हा इतिहास दडपून ठेवण्यातच धन्यता मानण्यात आली होती; मात्र आता भाजप सरकारच्या काळात यात पालट होणे आवश्यक आहे. भारतीय पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. सरकारनेच दायित्व घेऊन या विभागाला आदेश देऊन ‘ज्या वास्तू मोगलांच्या आहेत’, असे सांगितले जात आहे, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांची सत्य माहिती स्वतःहून जगासमोर उघड केली पाहिजे. मग तो ताजमहाल असो, कुतूबमिनार असो किंवा भोजशाळा असो. यासाठी हिंदूंना न्यायालयात जाऊन चकरा मारण्याची आवश्यकता लागू नये. हिंदूंनी निवडून दिलेले सरकार म्हणून याकडे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. गोव्यात पोर्तुगिजांनी पाडलेली मंदिरे पुन्हा उभारण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप सरकार करणार आहे, म्हणजे सरकारने हे मान्य केले आहे की, राज्यात पोर्तुगिजांनी मंदिरे पाडली होती. त्यातही हिंदूंचे म्हणणे आहे की, काही मंदिरांचे रूपांतर चर्चमध्ये करण्यात आले आहे, तेही सरकारने समोर आणले पाहिजे. तसेच केंद्र सरकारने केले पाहिजे, अशीच हिंदूंची मागणी आहे. तुर्कस्तानमधील १२ व्या शतकातील हागिया सोफिया या चर्चचे रूपांतर १४ व्या शतकात मुसलमान तुर्क शासनकर्त्याने मशिदीमध्ये केले. वर्ष १९३५ मध्ये तुर्कस्तानमधील धर्मनिरपेक्ष सरकारने त्याला संग्रहालय घोषित केले आणि आता वर्ष २०२० मध्ये तुर्कस्तानच्या एर्दाेगन सरकारने त्याचे पुन्हा मशिदीत रूपांतर केले. तुर्कस्तानमधील खरा इतिहास समोर आणला जात असेल, तसे भारतातही होणे आवश्यक आहे. ते संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे आणि त्याने ते केले पाहिजे. ‘हिंदूंना न्यायालयाच्या पायऱ्या चढून ते करावे लागणे अपेक्षित नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

हिंदूंच्या प्राचीन वास्तूंचे मूळ स्वरूप उघड करण्यासाठी झगडावे लागणे लज्जास्पद !