(म्हणे) ‘हिंदु धर्मात समानता आणि मानवता नव्हती, तर राज्यघटनेमुळे ती आली !’ – अभय ठिपसे, माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय

  • माजी न्यायमूर्तींचे हिंदु धर्माविषयीचे कलुषित मत पहाता त्यांनी हिंदु धर्म आणि हिंदू यांच्याशी निगडित दिलेल्या निवाड्यांची चौकशी व्हावी, अशी हिंदूंनी मागणी केल्यास चूक ते काय ? – संपादक
  • विश्वकल्याणाची शिकवण देणारे ऋषी आणि संत परंपरा लाभलेल्या हिंदु धर्माविषयी सर्वसामान्य माहितीही नसलेल्या व्यक्तीने एकेकाळी न्यायाधीशपद भूषवणे, हे न्यायव्यवस्थेचे दुर्दैव ! – संपादक

मुंबई, २ एप्रिल (वार्ता.) – हिंदु राष्ट्र काय आहे ? इंग्रज येण्यापूर्वी भारत देश ३०० हून अधिक संस्थांनांमध्ये विखुरला होता, ज्यामध्ये प्रत्येकाचे कायदे स्वतंत्र होते. असे हिंदु राष्ट्र तुम्हाला हवे आहे का ? हिंदु धर्मात मानवता आणि समानता नव्हती. (भारतात संस्थाने होती आणि चक्रवर्ती राजेही होते. असे असले, तरी आजसारखे भारतात सत्तेसाठी लोकांची लूटमार करणे, स्त्रियांवर अत्याचार करणे, यांचा अतिरेक झाला नव्हता. या सर्वांमध्ये ‘हिंदु धर्म आणि त्याची शिकवण’ हा समान धागा होता. त्यामुळे समाजही सुसंस्कृत आणि त्यागी होता. त्यामुळे अशी विधाने अज्ञान प्रकट करतात ! – संपादक)

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेमुळे समानता आणि मानवता या संकल्पना भारतात रुजवल्या गेल्या, असे अभ्यासहीन विधान मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी केले. (राज्यघटनेमध्ये समानता, मानवता आदी आणण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्मग्रंथांचा आधार घेतला होता, हे माजी न्यायमूर्ती विसरले का ? – संपादक) १ एप्रिल या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात ‘युनायटेड अगेंस्ट इनजस्टीस अँड डिस्क्रीमिनेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अजेन्डा बिहाइंड द कश्मीर फाइल्स’ या कार्यक्रमात ठिपसे बोलत होते. या वेळी राज्यसभेचे माजी सदस्य माजिद मेमन, हिंदुद्वेषी लेखिका तिस्ता सेटलवाड आणि लेखक अशोककुमार पाण्डेय हे उपस्थित होते. (माजिद मेमन किंवा तिस्ता सेटलवाड यांचे राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचार सर्वांना ठाऊक आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचारांची गरळओक करणारे माध्यम होते, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक)

अभय ठिपसे यांचे अज्ञान प्रकट करणारी काही वक्तव्ये

(म्हणे) ‘बहुतांश हिंदू हे मुसलमानांचा द्वेष करतात !’

एखादी गोष्ट जरी सत्य असली, तरी ती द्वेष निर्माण करण्यासाठी बोलली जात असेल, तर ते चुकीचे आहे. (कश्मीर फाइल्सद्वारे धर्मांधांचे खरे स्वरूप उघड झाल्यावर हिंदुविरोधक असे तत्त्वज्ञान झोडू लागले आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक) मुसलमानांविषयीचा हा द्वेष पूर्वीपासूनच आहे. आजही राजकारणी नसलेले बहुतांश हिंदू हे मुसलमानांचा द्वेष करतात. (मोगलांनी हिंदूंचे धर्मांतर आणि हिंदु स्त्रियांवर बलात्कार करूनही हिंदूंनी त्यांना सामावून घेतले. हिंदूबहुल राष्ट्र असतांनाही हिंदु राष्ट्राचा हेका न धरता मुसलमानांना अल्पसंख्यांकांचा दर्जा देऊन अधिक सुविधा दिल्या; पण तरीही ‘कृतघ्नपणा करणाऱ्यांवर हिंदूंनी प्रेम करावे’, अशी शिकवण देणारे ठिपसे मुसमलनांना हिंदुद्वेष सोडायला का सांगत नाहीत ? – संपादक)

(म्हणे) ‘हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे सांगून द्वेष निर्माण करणे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिद्धांत !’

हिंदूंवर सहस्रावधी वर्षांपासून अत्याचार होत आहेत. मागील ६०-७० वर्षांपासून हे सूत्र समोर ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम चालू आहे. ‘मुसलमान बाबरचे वंशज आहेत’, हा संघाचा सिद्धांत आहे. ‘आपला देश चांगला होता. आपल्यावर इंग्रज आणि मोगल यांनी अत्याचार केले, त्याचा सूड उगवला पाहिजे’, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिद्धांत आहे. (हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमानांवर सूड उगवण्याचा निश्चय केला असता, तर एव्हाना भारतातील स्थिती वेगळी असती. माजी न्यायमूर्तींची ही विधाने संघद्वेषापायी आहेत, हे येथे लक्षात येते !  – संपादक)