मुसलमान देशांनी पाकिस्तानच्या तालावर नाचू नये ! – भारताची चेतावणी

पाकमधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या बैठकीत काश्मीरचे सूत्र मांडल्याचे प्रकरण

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची

नवी देहली – पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआसी) या संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काश्मीरचे सूत्र मांडण्यात आले होते. काश्मीरमधील कथित मानवाधिकार उल्लंघनाचा संदर्भ देत ‘ओआयसी’ने म्हटले की, काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळायला हवा. ‘ओआयसी’च्या या विधानावर भारताने तीव्र आक्षेप घेत हे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तसेच मुसलमान देशांनी पाकिस्तानच्या इशार्‍यावर नाचू नये, अशी चेतावणीही भारताने दिली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या अधिकृत टि्वटरद्वारे हे विधान केले.

भारताकडून निवेदनात म्हटले आहे की, ‘ओआयसी’च्या बैठकीत काश्मीरविषयी संमत केलेला ठराव हे दर्शवते की, या संघटनेवर पाकिस्तानचा मोठा पगडा आहे. ‘ओआयसी’मधील भारताचा उल्लेख खोटेपणावर आधारित आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे वारंवार उल्लंघन होत आहे. पाकच्या सांगण्यावरून ‘ओआयसी’तील सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी भारतातील अल्पसंख्यांकांविषयी विधान करणे मूर्खपणाचे आहे.