गेल्या ३ वर्षांत देशात दलितांवरील अत्याचारांची १ लाख ३८ सहस्रांहून अधिक प्रकरणांची नोंद ! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माहिती

गेल्या ३ वर्षांत हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचीही आकडेवारी केंद्र सरकारने देशातील जनतेला सांगितली पाहिजे ! – संपादक

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

नवी देहली – भारतात वर्ष २०१८ ते २०२० या कालावधीत दलितांवरील अत्याचारांशी संबंधित १ लाख ३८ सहस्र ८२५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संसदेत दिली. बहुजन समाज पक्षाचे सदस्य हाजी फजलुर रहमान यांनी याविषयी प्रश्‍न विचारला होता. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या वर्ष २०२१ च्या अहवालात दलितांवरील अत्याचारांची संख्या ८ सहस्र २७२ इतकी झाली आहे, म्हणजे त्यात ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आठवले पुढे म्हणाले की,

१. वर्ष २०१८ मध्ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’ची ४२ सहस्र ७९३ प्रकरणे नोंदवली गेली. वर्ष २०१९ मध्ये यात वाढ होऊन ती ४५ सहस्र ९६१, तर २०२० मध्ये ५० सहस्र २९१ इतकी झाली.

२. उत्तरप्रदेशात वर्ष २०२० मध्ये १२ सहस्र ७१४ प्रकरणे नोंदवण्यात आली. गेल्या ३ तेथे वर्षांत सर्वाधिक, म्हणजे ३६ सहस्र ४६७ प्रकरणेदेखील नोंदवली गेली. त्यानंतर बिहार २० सहस्र ९७३, राजस्थान १८ सहस्र ४१८ आणि मध्यप्रदेशमध्ये १६ सहस्र ९५२ अशा प्रकरणांची नोंद करण्यात आली.

३. गेल्या ३ वर्षांत दलितांविरुद्ध सर्वांत अल्प गुन्ह्यांची नोंद बंगालमध्ये झाली. येथे केवळ ३७३, पंजाबमध्ये ४९९, छत्तीसगडमध्ये ९२१, तर झारखंडमध्ये १ सहस्र ८५४ प्रकरणे नोंदवण्यात आली.

४. दक्षिणेकडील राज्यांपैकी आंध्रप्रदेशमध्ये गेल्या ३ वर्षांत ५ सहस्र ८५७, तेलंगाणा ५ सहस्र १५६, कर्नाटक ४ सहस्र २७७, तमिळनाडूमध्ये ३ सहस्र ८३१ आणि केरळमध्ये २ सहस्र ५९१ इतकी प्रकरणे नोंदवली गेली.