केंद्राच्या ३ कृषी कायद्यांना देशातील तब्बल ८६ टक्के शेतकर्‍यांचा होता पाठिंबा !

  • पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील शेतकर्‍यांकडून सातत्याने होत असलेल्या विरोधामुळे केंद्राला मागे घ्यावे लागले होते कायदे !

  • सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातील माहिती !

  • अहवाल सादर केल्याच्या एका वर्षानंतर माहिती उघड !

  • कृषीप्रधान देशात शेतकर्‍यांच्या हिताच्या कायद्यांना विरोध होतो आणि सरकारला त्यासमोर झुकावे लागते, हे भारताच्या हिताचे नाही. असा विरोध करणार्‍या समाजकंटकांवर सरकारने कारवाई करावी ! – संपादक
  • ‘एवढी महत्त्वपूर्ण माहिती १ वर्ष का दडपून ठेवण्यात आली ?’, ‘जर बहुसंख्यांक शेतकर्‍यांचा कायद्यांना पाठिंबा होता, तर त्याचा विचार का करण्यात आला नाही ?’, ‘केंद्रावर असा कोणता दबाव होता की ज्यामुळे बहुसंख्यांक शेतकर्‍यांच्या मताचा विचार केला गेला नाही ?’, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. याची माहिती कृषीप्रधान देशाला कळायला हवी ! – संपादक
कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी (?)

नवी देहली – केंद्राकडून वर्ष २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांना देशातील तब्बल ८६ टक्के शेतकर्‍यांचा म्हणजे ३ कोटींहून अधिक शेतकर्‍यांचा पाठिंबा होता, असे सर्वाेच्च न्यायालयाने बनवलेल्या समितीने तिच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल १ वर्षापूर्वीच न्यायालयाला सुपूर्द करण्यात आला होता; परंतु त्यातील माहिती आता समोर आली आहे. ३ कृषी कायद्यांना पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने केंद्राला हे तीनही कायदे रहित करावे लागले. आता वरील अहवाल समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणामध्ये काहीतरी काळेबेरे आहे, अशी चर्चा होत आहे. आता वेळ निघून गेल्याने या अहवालाचा फारसा उपयोग होणार नाही, असेही म्हटले जात आहे.

१. तीन कृषी कायद्यांना शेतकर्‍यांचा व्यापक विरोध होत असल्याचे पाहून जानेवारी २०२० मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने ४ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित अभ्यासकांची समिती नेमून या कायद्यांचा अभ्यास करण्यास सांगितले होते.

२. समितीचे म्हणणे आहे की, बहुसंख्य शेतकर्‍यांचा केंद्राकडून सिद्ध करण्यात आलेल्या या कायद्यांना संपूर्ण पाठिंबा होता, हे लक्षात घ्यायला हवे.

बहुधा, संविधानाची सर्वात मोठी थट्टा – काही निवडक मूर्खांच्या दबावाखाली येऊन #FarmLaws रद्द करावे लागले !

३. शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामध्ये देशविरोधी खलिस्तानी शक्ती, जिहादी आणि फुटीरतावादी यांचाच भरणा अधिक होता, असे नंतर समोर आले होते; परंतु त्यांच्या विरोधाला झुकून शेवटी केंद्राला शेतकर्‍यांच्या हितासाठी बनवण्यात आलेल्या कायद्यांना रहित करावे लागले होते.

४. बहुसंख्यांक शेतकर्‍यांचा कृषी कायद्यांना पाठिंबा होता, ही मोठी बातमी इंग्रजी भारतीय प्रसारमाध्यमांतील केवळ ‘बिझनेस स्टँडर्ड’, ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘ऑपइंडिया’ यांनीच त्यांच्या वृत्त संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली आहे.