सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये प्रवचन, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे, तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना जिज्ञासूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

१. महाशिवरात्रीच्या कालावधीत झारखंड, बंगाल, बिहार आणि पूर्वाेत्तर भारत येथे ऑनलाईन प्रवचनांचे आयोजन

महाशिवरात्रीनिमित्त २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत झारखंड, बंगाल आणि पूर्वाेत्तर भारत येथे ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका सौ. इप्शिता पटनायक, सौ. मेघा पातेसरिया आणि कु. कनक भारद्वाज यांनी मार्गदर्शन केले. यासमवेत सामूहिक नामजपाच्या माध्यमातून भगवान शिवाची स्तुती करण्यात आली. याचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. तसेच झारखंड आणि बंगाल येथे ५ ठिकाणी ‘शिवचर्चा’ नामक कार्यक्रमामध्ये शिवाशी संबंधित शास्त्राची माहिती सांगण्यात आली. यासमवेतच सनातन-निर्मित ‘ॐ नमः शिवाय ।’ ही नामपट्टी आणि शिवाचे सात्त्विक चित्र यांचे वितरण करण्यात आले. यालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बिहारच्या विविध जिल्ह्यांमधील जिज्ञासूंसाठी सनातनच्या साधिका सौ. आशा झा, सौ. सुनीता चौरसिया आणि सौ. सीमा श्रीवास्तव यांनी १४ प्रवचने घेतली. यासमवेतच ४ ठिकाणी नामसत्संग घेण्यात आले. या नामसत्संगांमध्ये सौ. पूनम राय, सौ. वीणा तिवारी आणि सौ. प्रियंका मिश्रा यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या प्रवचनांचा लाभ अनुमाने २५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. भदोही (उत्तरप्रदेश) येथील श्री. श्रीकांत गुप्ता यांनी सनातनचे काही ग्रंथ खरेदी केले. ते म्हणाले, ‘‘तुमच्या संस्थेने धर्म जिवंत ठेवला आहे. लोकांना धर्माविषयी सांगणार्‍या संस्थेला तन, मन आणि धन स्वरूपात सर्वांनी साहाय्य केले पाहिजे.’’

२. पाटलीपुत्र (बिहार) येथील काही भाविकांनी ‘सनातनने सिद्ध केलेली देवतांची सात्त्विक चित्रे सजीव असून ती आपल्याशी बोलत आहेत’, असे वाटत असल्याचे सांगितले.

३. पाटलीपुत्र (बिहार) येथील एका भाविकाने सांगितले, ‘‘मी प्रतिवर्षी येथे महाशिवरात्रीला दर्शनासाठी येतो; पण यावर्षी सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावल्यामुळे येथील वातावरण पुष्कळ चांगले वाटत आहे.’’

२. सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला भाविकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

अ. महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या झारखंड राज्यातील धनबादमध्ये ४, कतरासगड आणि जमशेदपूर येथे प्रत्येकी एक अन् बंगालमध्ये ५ ठिकाणी सनातनचे चैतन्यमय ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या सेवेमध्ये संस्थेच्या साधकांसह धर्मप्रेमी अणि जिज्ञासू यांनीही सहभाग घेतला.

आ. उत्तरप्रदेशातील वाराणसीमध्ये ६, सुलतानपूर, अयोध्या, भदोही, सैदपूर येथे प्रत्येकी एक ठिकाणी सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

इ. बिहारमधील पाटलीपुत्र आणि मुझफ्फरपूर येथे प्रत्येकी २ ठिकाणी, तर सोनपूर, समस्तीपूर, गया अन् औरंगाबाद येथे प्रत्येकी एक ठिकाणी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

ई. झारखंडमधील धनबाद, कतरास आणि पूर्व सिंहभूम, बंगालमधील कोलकाता अन् उत्तर २४ परगणा आणि बिहारमधील बेगूसराय अन् पाटलीपुत्र या जिल्ह्यांमध्ये धर्मशिक्षण आणि अध्यात्मशास्त्र यांच्याविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. त्याचा समाजातील अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

उ. महाशिवरात्रीनिमित्त समाजातील अनेक धर्मप्रेमी हिंदूंनी शिवाची माहिती असणारे फलक प्रायोजित करून ते त्यांच्या परिसरातील मंदिरांमध्ये लावले. भित्तीपत्रक आणि हस्तपत्रक यांच्या माध्यमातूनही समाजामध्ये जागृती करण्यात आली.

उत्तरप्रदेश

१. ‘साधना’ सत्संगातील ३ जिज्ञासू शिक्षिकांनी त्यांच्या महाविद्यालयामध्ये महाशिवरात्रीचा विषय सांगितला. त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून सामूहिक नामजप करून घेतला.

२. ‘साधना’ सत्संगातील ४ जिज्ञासूंनी मंदिरांमध्ये नामजप लावण्याची आणि शिवाच्या माहितीचे भित्तीपत्रक लावण्याची सेवा केली.

३. सैदपूर येथे श्री. अवनीश झुनझुनवाला यांनी आणि गाझीपूर येथे श्री. राहुल शर्मा यांनी स्वत:हून प्रत्येकी ४० भित्तीपत्रके छापून दिली.

४. भदोही येथील पत्रकार श्री. संजय केसरी यांनी महाशिवरात्रीनिमित्त सनातनच्या साधकांची छोटी मुलाखत घेतली आणि ‘स्वराज एक्सप्रेस’ या वृत्तवाहिनीवर ती प्रसारित केली.

५. मुझफ्फरपूर येथे लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाची बातमी ‘हिंदुस्थान’ या स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली.

झारखंड

१. धनबाद येथे ग्रंथप्रदर्शनामध्ये लावण्यात आलेले धर्मशिक्षणाचे फलक एका जिज्ञासूने पाहिल्यानंतर त्यांनी ते प्रायोजित करण्याची मागणी केली.

२. जमशेदपूरच्या सिदगोडा बाजारामधील विविध दुकानदारांनी शिवाच्या माहितीचे फलक प्रायोजित करून कावंरिया धाम मंदिरामध्ये लावले.

३. जमशेदपूरच्या श्री शीतलामाता मंदिरामध्ये लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाची स्थानिक वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली.

४. कतरास येथे ‘शिवचर्चा’ कार्यक्रमानंतर तेथील जिज्ञासूंनी नियमित साप्ताहिक सत्संग चालू करण्याची मागणी केली. तसेच प्रवचन घेण्यासह ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी आमंत्रित केले.

बंगाल

बंगालमध्ये धर्मप्रेमींसह साधकांनी एकत्रितपणे ५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन केले.

बिहार

१. ‘साधना’ सत्संगातील जिज्ञासू सौ. इप्शिता पटनायक यांनी बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील ४ ठिकाणी शिवाविषयी शास्त्रीय माहिती असलेले फ्लेक्स फलक प्रायोजित करून लावले. तसेच सनातनच्या ‘शिव’ या लघुग्रंथाचे वितरण केले.

२. पाटलीपुत्र येथील ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी एका गरीब कामगाराने २ लघुग्रंथ आणि नामपट्ट्या घेतल्या. त्याने नामजप करण्याची सिद्धता दर्शवली. त्यानंतर तो घरी जाऊन परत आला आणि त्याने नामजपाविषयीची अधिक माहिती जाणून घेतली.