नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्‍या प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्‍या सांडपाण्याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची मागणी

रत्नागिरी, १० मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायती यांच्याकडून प्रतिदिन २ कोटी ३९ लाख लीटर प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र अन् नद्या यांमध्ये सोडले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी आणि श्री. सुरेश शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता ही धक्कादायक गोष्ट उघड झाली. प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया न करता तसेच सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला पर्यायाने जिवाला धोका निर्माण होत आहे, याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील सुराज्य अभियान उपक्रम समन्वयक श्री. संजय जोशी यांनी आज १० मार्चला शेषाराम हॉल, मारुति मंदिर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. विनोद गादीकर, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी या उपस्थित होत्या.

डावीकडून श्री. संदेश गावडे, बोलतांना श्री. संजय जोशी आणि अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी

श्री. जोशी म्हणाले की, प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडल्याने समुद्रातील जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होतो. प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश जनता मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरील शहरांतही पाठवले जात असल्याने या धोक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

तथाकथित पर्यावरणवाद्यांना आवाहन

गणेशोत्सव आला की, तथाकथित पर्यावरणवादी मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणून ओरड करतात. रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिदिन २ कोटी ३९ लाख लीटर प्रदूषित पाणी सोडले जात आहे, या विरोधात हे पर्यावरणवादी आवाज उठवणार का ?, सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे प्रदूषित पाणी, तसेच समुद्र आणि नद्यांमध्ये सोडणार्‍या नगरपरिषदांना स्वच्छता अभियानात क्रमांक कसा मिळतो ? असा प्रश्‍न श्री. संजय जोशी यांनी उपस्थित केला.

पर्यावरणप्रेमींना आवाहन

जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या सुराज्य अभियान उपक्रमात पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. जोशी यांनी केले.

नगरपरिषदा, पालिका यांच्यासमवेत प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक ! – अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी, हिंदु विधीज्ञ परिषद

प्रदूषण करणे, हा गुन्हा असून त्यावर कारवाई न करणे, हे गुन्ह्याला पाठीशी घालणे आहे. प्रदूषण ही विषारी समस्या असून शहरीकरणाकडे चाललेल्या कोकणामध्ये आताच या समस्येवर कारवाई केली नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रदूषण थांबवण्यासाठी संबंधितांनी त्वरित कारवाई करावी, असे आवाहन अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी यांनी केले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावरीही फौजदारी कारवाई होऊ शकते ! – श्री. संदेश गावडे, हिंदु जनजागृती समिती, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक

अलीकडेच कोरोना, ओमिक्रॉन यांसारख्या संसर्गजन्य महामारीने अख्खे जग ग्रासलेले असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवाचा धोका वाढवत आहे. सुजलाम् सुफलाम् असलेले कोकण या सांडपाण्याने प्रदूषित होत आहे. या प्रकरणी आम्ही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचा सल्ला घेतला. त्यामुळे नगरपरिषदा आणि पालिका यांच्यावरच नव्हे; तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही विभागीय चौकशीसह फौजदारी कारवाई होऊ शकते, असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला.

विशेष : या वेळी राजिवडा आणि गेट वे ऑफ रत्नागिरी (मांडवी) येथील प्रदूषणाची छायाचित्रे दाखवण्यात आली.

राजिवडा येथे समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी

गेट वे ऑफ रत्नागिरी (मांडवी) येथे समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी
मांडवी येथे समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी