मंगलमय स्वस्तिक !

हिंदु धर्मावर आघात करण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन हवे !

कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार आहे. ही जगभरातील हिंदूंसाठी आनंददायी वार्ता आहे. कॅनडामध्ये कोरोना संसर्गाच्या काळात अमेरिका-कॅनडा असा प्रवास करणार्‍या ट्रकचालकांसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली. त्याला ट्रकचालकांनी विरोध केला. त्या वेळी ट्रकचालकांनी हिटलरच्या काळात नाझींचे ‘हुक्ड क्रॉस’ चिन्ह असलेले झेंडे फडकावले. ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी आणणे आवश्यक; मात्र कॅनडाच्या संसदेमध्ये ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’ने स्वस्तिकवर बंदी आणण्यासाठी खासगी विधेयक आणले. ते आणण्यामागे या पक्षाचे अध्यक्ष आणि संसद जगमीतसिंह धालीवाल यांचाही हात होता.

जगमीतसिंह धालीवाल, ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’

‘स्वस्तिकला कॅनडात स्थान नाही. आपल्या समाजाला सर्वांपासून सुरक्षित ठेवणे, हे आपले दायित्व आहे. द्वेषाचे प्रतीक असलेल्या या चिन्हावर बंदी घालणे आवश्यक आहे’, असे ते म्हणाले होते. विदेशी लोकांना स्वस्तिक आणि ‘नाझी हुक्ड क्रॉस’ यांच्यातील भेद लक्षात येत नाही, हे आपण एकवेळ समजू शकतो; मात्र धालीवाल हे पंजाबी असूनही त्यांच्या हे का लक्षात आले नाही ?

साधारण शीख आणि हिंदु धर्मीय यांच्या परंपरेत बरेच साम्य असल्यामुळे हिंदू त्यांच्या धर्मपरंपरेनुसार वापरत असलेले स्वस्तिक आणि ‘नाझी हुक्ड क्रॉस’ यांच्यात भेद आहे, हे धालीवाल यांना लक्षात येणे आवश्यक होते; मात्र ते हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी खलिस्तानवादी विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी याकडे कानाडोळा केला. ‘जगात हिंदूंना दुय्यम कसे दाखवता येईल, तसेच त्यांच्या प्रथा आणि परंपरा या समाजविघातक असतात’, हे दाखवण्याचा हा विकृत प्रयत्न होता; मात्र केवळ कॅनडाच नव्हे, तर जगभरातील जागृत हिंदूंच्या प्रयत्नांमुळे हे षड्यंत्र हाणून पाडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही ‘हिंसेचे प्रतीक असलेले स्वस्तिक’ असा शब्दप्रयोग केल्यामुळे कॅनडातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली होती. भारतीय दूतावासानेही याची नोंद घेऊन भारतियांनी याविषयी नोंदवलेल्या आक्षेपाविषयी कॅनडा सरकारला माहिती दिली. एकंदरीत स्वस्तिकच्या सूत्रावरून हे लक्षात येते की, जागतिक स्तरावर भारतीय संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांचे अवमूल्यन करण्यासाठी पद्धतशीरपणे षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्यासाठी जागतिक स्तरावर हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक आहे. कॅनडामध्ये हिंदू आणि शीख यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे जर स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती आणि तेथील हिंदूंना धर्मपालन करण्यापासून वंचित रहावे लागले असते. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !