विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने प्रशासनाला त्वरित आदेश द्यावेत !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्ग आणि हिंदु जनजागृती समिती यांची मागणी

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्याशी निगडीत वारसास्थळांच्या संवर्धनाची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

दोडामार्ग – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्रपती शिवरायांनी सागरी मार्गाने होणारे आक्रमण मोडून काढण्यासाठी स्वतःचे आरमार आणि जलदुर्ग यांचीही निर्मिती केली. जलदुर्ग हे शिवरायांच्या दुर्ग बांधणीच्या तंत्रज्ञानाचा अभूतपूर्व अविष्कारच आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या जलदुर्गांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. आज या किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या किल्ल्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित खात्यांना त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्ग आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तसेच सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नायब तहसीलदार सत्यवान गवस यांना निवेदन देताना डावीकडून मंगेश पाटील, कु. पूजा धुरी, श्री. साईनाथ डुबळे, देवेंद्र शेटकर आणि भगवान गवस

हे पण वाचा : विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यांसाठी स्थानिक ग्रामस्थांची निदर्शने
————————-

याविषयी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांना देण्याचे निवेदन येथील नायब तहसीलदार सत्यवान गवस यांना देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मंगेश पाटील, खोक्रलचे सरपंच देवेंद्र शेटकर, मणेरी येथील धर्माभिमानी भगवान गवस, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुनील नांगरे, साईनाथ डुबळे आणि कु. पूजा धुरी हे उपस्थित होते.