विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यांसाठी स्थानिक ग्रामस्थांची निदर्शने

हिंदु जनजागृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद

किल्ले विजयदुर्ग !

विजयदुर्ग, ३० डिसेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीने गडकोट संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्याची झालेली दुरवस्था थांबवून त्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी २९ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्यात आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर विजयदुर्ग किल्ला परिसरातील ग्रामस्थांनी २९ डिसेंबरला किल्ल्यावर निदर्शने केली. या वेळी ग्रामस्थांनी घोषणाही दिल्या. त्यानंतर किल्ल्यात होणार्‍या दीपोत्सवानिमित्त तेथे स्वच्छताही करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या गडकोट, किल्ले संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत विजयदुर्ग किल्ल्याच्या अनुषंगाने २७ डिसेंबर या दिवशी ओरोस येथे पत्रकार परिषदेत घेतली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून २९ डिसेंबरला होणार्‍या आंदोलनात सहभागी होण्याचे लोकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन विजयदुर्ग, गिर्ये आणि रामेश्वर या गावांतील ग्रामस्थांनी किल्ल्यावर एकत्र येत आंदोलन केले.

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विजयदुर्ग किल्ल्यावरील भवानी मंदिराजवळ अवतरल्या नवदुर्गा !
(चित्र सौजन्य – Prahaar | Digital)

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोखले, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी विजयदुर्ग किल्ला संवर्धनाविषयीच्या मागण्यांचे फलक हाती घेतले होते. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, अशा घोषणा दिल्या.


हे पण वाचा

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी
https://sanatanprabhat.org/marathi/539220.html

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.


विजयदुर्ग किल्ल्याची पडझड थांबवून संपूर्णपणे संवर्धन करावे ! – राजेंद्र परूळेकर, सल्लागार, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ

या वेळी राजेंद्र परुळेकर म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीने घोषित केलेल्या आंदोलनात सहभागी होत रामेश्वर, विजयदुर्ग आणि गिर्ये या गावांच्या ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेतली. येथील शिवप्रेमींमध्ये जागृती करणे, हा या स्वच्छता मोहिमेचा उद्देश आहे. किल्ल्याची पडझड रोखून किल्ल्याचे संपूर्णपणे संवर्धन करावे, तसेच गडावर येणार्‍या दुर्गप्रेमींना सोयीसुविधा पुरवाव्यात. या किल्ल्याचे संरक्षण करून पर्यटक या ठिकाणी अधिकाधिक कसे येतील ? यासाठी उपाययोजना करावी. ३ जानेवारी २०२२ या दिवशी ग्रामस्थ आणि विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांना देण्यासाठी देवगड तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.