‘के.एम्.टी.’ची महिलांसाठी विशेष बस सेवा लवकरच चालू होणार !

कोल्हापूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – खास महिलांसाठी विशेष बससेवा चालू करण्यासाठी विशिष्ट मार्गाचा सर्वेक्षण करण्याची सूचना महापालिका प्रशासकांनी केली आहे. शाळा, महाविद्यालय येथे जाणार्‍या विद्यार्थिनी, नोकरदार महिला ‘के.एम्.टी.’तून (कोल्हापूर महानगरपालिका परिवहन) प्रवास करतात. सध्या एस्.टी. बंद असल्याने ग्रामीण भागांतून दररोज शहरात येणारे प्रवासी ‘के.एम्.टी.’कडे वळले आहेत. पुरुष आणि महिला एकाच गाडीतून प्रवास करतात. महिलांसाठी विशेष बससेवा नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. जागा न मिळाल्यास उभे राहून प्रवास करावा लागतो. त्यातून महिलांना दिलासा मिळावा. ज्या मार्गावर प्रवासी महिलांची संख्या अधिक आहे, अशा मार्गाचे सर्वेक्षण गूगल अर्जाद्वारे केले जाणार आहे. महापालिकेच्या गेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी बससेवा चालू करण्याचा संकल्प केला होता. नव्या वर्षात महिलांसाठी विशेष सेवा चालू झाल्यास ‘के.एम्.टी.’च्या दृष्टीने, तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.