(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

  • ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेचा राजकीय पक्ष असलेल्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा नेता नुरूद्दीन फारुखी याची धमकी

  • विधानाची चौकशी करून कारवाई करण्याचा पोलिसांना आदेश

  • हिंदूंचे डोळे फोडण्याची धमकी !

अशा प्रकारची विधाने करणारे नेते असणार्‍या पक्षावर बंदी घातली पाहिजे ! कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने त्याने यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

उजवीकडे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा नेता नुरूद्दीन फारुखी

मैसुरू (कर्नाटक) – मी कर्नाटकमध्ये बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना सांगू इच्छितो की, जर ते धर्मनिरपेक्षतेला नष्ट करू इच्छित असतील आणि राज्यातील श्रीरंगपट्टणम् येथे मशिदीच्या ठिकाणी मंदिर बांधण्याचे धाडस करू इच्छित असतील, तर टिपू सुलतानचा प्रत्येक सैनिक तुमचे डोळे फोडण्यास सिद्ध आहे. तुम्ही कितीही मोठे मंदिर बांधा, तिथे ‘अल्ला हू अकबर’ची घोषणाच दुमदुमेल, अशी धमकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेचा राजकीय पक्ष असलेल्या ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चा (एस्.डी.पी.आय.चा) नेता नुरूद्दीन फारुखी याने दिली आहे. येथे एका निदर्शनाच्या वेळी तो बोलत होता. याविषयी कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी म्हटले की, या प्रकरणी योग्य माहिती घेऊन मैसुरू पोलिसांना कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

१. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी याविषयी बोलतांना नुरूद्दीन फारुखी याने या विधानावर स्पष्टीकरण देतांना म्हटले की, मशिदीमध्ये हिंदूंच्या गटांकडून हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मी केलेले विधान हे कर्नाटकचे मंत्री के.एस्. ईश्वरप्पा आणि कर्नाटकचे आमदार यतनाल यांनी केलेल्या विधानाला दिलेले प्रत्युत्तर होते.

२. दुसरीकडे एस्.डी.पी.आय.चे एक ज्येष्ठ सदस्य याविषयी म्हणाले की, फारुखी यांनी केवळ इतकेच म्हटले होते की, रा.स्व. संघवाले जर राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि मशीद यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांचे (संघाच्या स्वयंसेवकांचे) डोळे फोडण्यात येतील.        ईश्वरप्पा आणि भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनीही यापूर्वी अशा प्रकारची विधाने केली आहेत. त्या तुलनेत फारुखी यांचे विधान मोठे नाही.

काय आहे प्रकरण ?

मैसुरू येथे काही हिंदु संघटनांकडून श्रीरंगपट्टणम् येथील मशिदीमध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्याची योजना आखण्यात आली होती. या मशिदीच्या स्थानी पूर्वी हनुमान मंदिर होते, असे या संघटनांचे म्हणणे आहे. याला विरोध करण्यासाठी एस्.डी.पी.आय.कडून निदर्शने करण्यात आली होती. तेव्हा नुरूद्दीन फारुखी याने ही धमकी दिली.