१. श्री. रवि गोयल यांच्याशी झालेली प्रथम भेट !
१ अ. ‘श्री. रवि गोयल यांच्याशी भेट होणे’, हे ईश्वरी नियोजन असल्याचे लक्षात येणे : ‘जानेवारी २०११ मध्ये मी ‘उपासना’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रसाराला आरंभ केला. त्यानिमित्त मी भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करत होते. फेब्रुवारी २०१२ मध्ये माझ्याकडे प्रवासाची पुष्कळ तिकिटे आणि अन्य पावत्या गोळा झाल्या होत्या. मला संपूर्ण वर्षभराचा लेखाचा अभ्यास करून आयकर भरायचा होता. मला हे पुष्कळ कठीण वाटत होते. मी भगवंताला म्हटले, ‘तुम्ही सांगितले; म्हणून मी समष्टीत जाऊन धर्मजागृतीचे कार्य करत आहे; परंतु हे लेखाचे कार्य माझ्याकडून होऊ शकत नाही. यासाठी जर आपण कुणी योग्य साधक दिला नाही, तर मी समष्टीचे कार्य पुढे करू शकणार नाही. आपण मला क्षमा करावी.’ मी ईश्वराच्या आज्ञेनुरूपच ‘उपासना’ नावाच्या संस्थेची स्थापना केली होती. त्यामुळे मी ‘मला जी अडचण येईल, ती मी ईश्वरालाच सांगणार ना ?’, असा विचार केला. कदाचित भगवंताला वाटले असेल, ‘ही वेडी खरंच समष्टी साधना सोडून तर देणार नाही ना ?’ त्यामुळे त्याने रविदादाला आम्हाला भेट स्वरूपात दिले.
१ आ. लेखाच्या सर्व हिशोबाची सेवा श्री. गोयल यांनी सांभाळणे आणि ‘ते ईश्वराचे देवदूतच आहेत’, असे जाणवणे : या घटनेनंतर २ – ३ मासांतच माझा रविदादांशी परिचय झाला आणि तेव्हापासून आजतागायत मला संस्थेच्या लेखाचे काहीही पहावे लागत नाही. मला केवळ लेखासंबंधी महत्त्वाच्या पत्रांवर स्वाक्षरी करावी लागते. रविदादा आमच्या संस्थेचा लेखाचा सर्व भाग सांभाळत आहेत. मला वैयक्तिक स्तरावर युरोपला जाण्यासाठी पारपत्र (व्हिसा) आणि अमेरिकेला जाण्यासाठी पारपत्र (व्हिसा) यांसाठी आयकर भरायचा होता. ते सर्वकाही करतात आणि माझा आयकरसुद्धा भरतात ! युरोप, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात इत्यादी देशांमध्ये पारपत्रासाठी (व्हिसासाठी) जी काही कागदोपत्री कार्यवाही करावी लागते, ती ते आणि त्यांची पत्नी माझ्यासाठी करून देत होते. मला त्या संदर्भातही काहीच पहावे लागले नाही. वाहन घेण्यासाठी कर्ज घेण्याच्या संदर्भातही सर्व प्रयत्न त्यांनीच केले. त्यामुळे ते माझ्यासाठी ईश्वराचे देवदूत आहेत.
१ इ. श्री. रवि गोयल यांना न पहाताच त्यांच्या पत्नीला ‘मी तुमच्या यजमानांसाठी आले असून ते एक चांगले साधक आहेत’, असे उत्स्फूर्तपणे बोलले जाणे : माझा श्री. रवि गोयल यांच्याशी परिचय त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून झाला. जेव्हा त्यांच्या पत्नीने मला पहिल्यांदा त्यांच्या घरी येण्यासाठी आमंत्रित केले होते, तेव्हा त्यांच्या घरात पाऊल ठेवताच माझ्या मुखातून शब्द निघाले, ‘‘मी तुमच्या यजमानांसाठी येथे आले आहे. ते एक चांगले साधक आहेत.’’ त्या वेळी मी त्यांच्या यजमानांना पाहिलेही नव्हते. मी हेसुद्धा जाणत नव्हते की, ते सनदी लेखापाल आहेत. हा ईश्वराने दिलेला संदेश होता.
१ ई. श्री. रवि गोयल यांना पाहिल्यावर ईश्वराने बोलून घेतलेले वरील वाक्य सत्य असल्याचे लक्षात येणे : त्यांच्या पत्नीने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले. मी विचारले, ‘‘काय झाले ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘माझे यजमान अधिक साधना करत नाहीत. मीच त्यांच्यापेक्षा अधिक पूजा-पाठ करते आणि मलाच साधनेची अधिक आवड आहे.’’ मी म्हटले, ‘‘भविष्यात तुम्हाला सर्व समजेल’’ आणि तसेच झाले. जेव्हा मी श्री. रवि गोयल यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांना पहाताच माझ्या लक्षात आले, ‘ते एक चांगले साधक आहेत आणि ईश्वराने माझ्याकडून जे बोलवून घेतले होते, ते सत्य होते.’ कालांतराने त्यांची पत्नी काही कारणास्तव केवळ व्यष्टी साधना करायला लागली; परंतु रविदादा अजूनही व्यष्टी आणि समष्टी साधना करत आहेत.
२. श्री. रवि गोयल यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. प्रेमभाव
१. श्री. रवि गोयल सर्वांशी मिळूनमिसळून वागतात, तसेच त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे सर्व साधक त्यांच्यावर पुष्कळ प्रेम करतात. रविदादा सर्वांची काळजी घेतात आणि ‘कुणाला काय पाहिजे ?’, हे लक्षात घेऊन त्याविषयीची सर्व व्यवस्था करतात.
२. जेव्हा मी देहलीमध्ये होते, तेव्हा कोणताही सण असो; ते सर्वप्रथम संपूर्ण परिवारासह आश्रमात येत होते. ‘सर्व साधकांसाठी भेटवस्तू आणणे, आश्रमाला फुले आणि तोरण यांनी सजवणे’, हे सर्व करूनच ते घरी जात होते.
२ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांना स्वयंस्फूर्तीने आरंभ करणे : वर्ष २०१२ मध्ये मी धर्मयात्रेच्या निमित्त नेपाळला निघाले होते. त्या वेळी माझ्यासह एक साधिका आणि रविदादा होते. रविदादा नेपाळहून आल्यानंतर स्वयंस्फूर्तीने स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करायला लागले आणि स्वतःच्या चुका ‘फेसबूक’वर साधकांच्या एका गटात लिहायला लागले. त्यांनी लिहिलेल्या चुकांतून त्यांच्यातील ‘सहजता, नम्रता, अंतर्मुखता आणि प्रामाणिकपणा’, यांसारखे गुण माझ्या लक्षात आले.
२ इ. त्यागी वृत्ती : त्यांनी देहलीमध्ये एका मोठ्या इमारतीतील आपली बहुमूल्य नूतन सदनिका (फ्लॅट) ‘उपासना’साठी दिली. आम्ही त्यांच्या या जागेत ३ वर्षे राहिलो. त्या सदनिकेचे भाडे ३५ सहस्र रुपये होते; परंतु त्यांनी आमच्याकडून कधीच काही घेतले नाही. त्यांना ‘अन्नदान करणे किंवा लोकांना भोजन देणे’ पुष्कळ आवडते. त्यामुळे जोपर्यंत ‘उपासना’चा आश्रम देहलीमध्ये होता, तोपर्यंत त्यांनी आम्हाला कधी भाज्या, फळे इत्यादी विकत घेऊ दिले नाही. ते प्रत्येक आठवड्यात येऊन सर्व बघत होते आणि जे पदार्थ नसायचे, ते स्वतःच आणून द्यायचे. भाजी आणल्यावर ते पती-पत्नी त्या भाज्या स्वच्छ करून आणि व्यवस्थित करून शीतकपाटात ठेवायचे. ‘याविषयी मी कुणाला काही सांगावे’, असे त्यांना वाटत नव्हते. अनेक वेळा ते मला सांगायचे, ‘‘माझ्या त्यागाविषयी कुणाला काही सांगू नये. हे गुप्तच राहू द्यावे.’’
२ ई. धर्मप्रसाराची तळमळ : त्यांनी त्यांच्या विवाहाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रवचनाचे नियोजन केले होते. त्यात त्यांनी आपले सर्व मित्र आणि नातेवाईक यांना आमंत्रित केले होते. एकदा त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीही असेच नियोजन केले होते. ते दीपावलीमध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने सर्वांना भेट म्हणून देतात. ते धर्मप्रसाराची एकही संधी सोडत नाहीत.
२ उ. आज्ञापालन : त्यांना मी केवळ एकदा जरी काही सांगितले, तर ते पती-पत्नी मिळून ते कार्य पूर्ण केल्याविना रहात नाहीत. त्यामुळे त्यांना कोणतीही सेवा सांगितल्यानंतर मी निश्चिंत होते; कारण मला ठाऊक आहे, ‘ते नक्कीच ते कार्य पूर्ण करतील.’
२ ऊ. तीर्थयात्रेच्या वेळी पू. तनुजा ठाकूर यांची भावपूर्ण सेवा करणे : वर्ष २०१५ पासून माझे स्वास्थ्य पुष्कळ बिघडत गेले आणि नोव्हेंबर २०१६ पासून मला ‘सायनस’चा आणि फुप्फुसांचा जंतुदोष झाला अन् त्यानंतर उष्ण औषधे घेतल्यामुळे माझ्या आतड्यामध्ये व्रण झाले होते. माझी स्थिती गंभीर झाली होती. तेव्हा ईश्वराने मला संदेश दिला, ‘चारधामची तीर्थयात्रा करून ये’; म्हणून मी ती यात्रा आरंभ केली. त्या वेळी रविदादा आणि त्यांची पत्नी यांनी एखाद्या लहान मुलीसारखी माझी काळजी घेतली. अशी सेवा करत ते मला रामेश्वरम् आणि बद्रीनाथ येथे घेऊन गेले अन् त्याचा संपूर्ण व्ययसुद्धा त्यांनीच प्रेमाने उचलला. त्यानंतर माझी प्रकृती सुधारू लागली. जर रविदादा नसते, तर मी एवढी आजारी असल्यामुळे तीर्थयात्रा करण्याचा विचारसुद्धा करू शकले नसते.
२ ए. परात्पर गुरुदेवांप्रतीचा उत्कट भाव : वर्ष २०१२ च्या गुरुपौर्णिमेला मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राचे पूजन केले होते. ते परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र मी त्यांना दिले होते. त्या छायाचित्राचा रंग केवळ सहा मासांत गुलाबी झाला आहे. यावरून त्यांचा भाव लक्षात येतो.
त्यांनी आपले थोडे दोष आणि भोगी वृत्ती घालवली, तर ते लवकरच अध्यात्मात पुष्कळ पुढे जातील. त्या दिशेने हळूहळू का होईना; परंतु त्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. ‘ईश्वर त्यांना हे सर्व करण्यासाठी सद्बुद्धी देवो’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करते.’
– पू. तनुजा ठाकूर