हीच का धर्मनिरपेक्षता ?

संपादकीय

मशिदींवरील ध्वनिक्षेपकांच्या विरोधात कारवाई करताना शेपूट घालणारे पोलीस दुटप्पीच !

(प्रतिकात्मक चित्र)

संपूर्ण विश्वात अनेक धर्म आहेत. वास्तविक हिंदु धर्म सोडून अन्य पंथ आहेत; मात्र धर्मनिरपेक्ष प्रणालीमध्ये त्यांना ‘धर्म’ म्हणून मान्यता आहे. असो. प्रत्येक धर्माचे आचरण, पद्धती, शिक्षण यांत भिन्नता आहे. प्रत्येक धर्माची त्या त्या समाजाशी असलेली नाळ धर्मातील प्रथा-परंपरा यांवर अवलंबून असते. धर्मातील कोणतीही पद्धत संपूर्ण समाजावर लादली जाऊ नये किंवा ती इतरांना जाचक ठरू नये, याचा समतोल साधणे महत्त्वाचे असते. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात एका धर्मियांच्या उपासनेने दुसर्‍यांच्या स्वातंत्र्याला बाधा पोचू नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत; पण तसे न होता सार्वजनिकरित्या दिली जाणारी अजान म्हणजे अन्य धर्मियांच्या धर्मस्वातंत्र्यावर आणली जाणारी गदाच ठरते. या अजानचा आवाज ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून सर्वदूर पसरतो. त्यामुळे वयस्कर मंडळी, शालेय विद्यार्थी, लहान मुले या सर्वांसाठीच ती डोकेदुखी ठरते. ही समस्या केवळ भारतात नसून विश्वातील अनेक देशांना भेडसावत आहे; कारण आज अनेक देशांमध्ये इस्लामचा शिरकाव झालेला असल्याने तेथे मशिदी आणि ध्वनीक्षेपक आहेतच. अनेकांकडून या ध्वनीक्षेपकांना विरोध केला जातो. विरोधानंतर ध्वनीक्षेपकांचा आवाज तात्पुरता न्यून करण्यात येतो; पण पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या !’ अशीच स्थिती होते. हा विषय अतीसंवेदनशील असल्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याचीही काळजी घ्यायला हवी. असे जरी असले, तरी विश्वात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने न्यून केला. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. काही मासांपूर्वी इस्लामी राष्ट्र असणार्‍या सौदी अरेबियामध्येही तेथील सरकारने मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज अल्प करण्याचा आदेश दिला होता. तेथे त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. ‘कोट्यवधी संख्येने मुसलमान असणार्‍या इस्लामी देशांमध्ये जर हे घडू शकते, तर हिंदूबहुल भारतात असे का होत नाही ?’, हा प्रश्न प्रत्येकच भारतियाच्या मनात निर्माण झालेला असणार, यात शंका नाही. ‘इंडोनेशियाने जे करून दाखवले, ते भारतानेही करून दाखवावे’, ही समस्त भारतियांची अपेक्षा आहे. इंडोनेशियामध्ये लोकांनी सांगितले होते की, ध्वनीक्षेपकाच्या मोठ्या आवाजामुळे आमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. नैराश्य, चिडचिडेपणा, निद्रानाश अशा समस्या उद्भवत आहेत. या विरोधानंतर वरील निर्णय घेण्यात आला. काही वर्षांपूर्वी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले होते की, इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या वेळी वीज आणि मायक्रोफोन (भोंगे) असे काहीही नव्हते. त्यामुळेच मशिदींवर लावले जाणारे ध्वनीक्षेपक हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही. न्यायालयाच्या या विधानाचा सर्वच स्तरांवर विचार व्हायला हवा. राज्यघटनेने जरी सर्वांना आपापल्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असले, तरी नैतिकतेच्या दृष्टीने विचार करणेही अपेक्षित आहे.

बघे पोलीस !

भारतात गेल्या अनेक दशकांपासून मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. न्यायालयानेही अनेकदा यासंदर्भात आदेश दिले आहेत; पण त्यांची कार्यवाही होतांना दिसत नाही, हे भारताचे दुर्दैव ठरते. अनेक मशिदींमध्ये तर हे ध्वनीक्षेपक अवैध स्वरूपात बसवलेले असतात; पण त्याविरोधातही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यातून होणारे प्रदूषण रोखणे ही तर दूरचीच गोष्ट आहे. या सगळ्यात न्यायालयाच्या जोडीला पोलीस प्रशासनाची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण असते; पण पोलीस बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे दुसरे काहीच करत नाहीत. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांमध्ये ध्वनीक्षेपकांवर कारवाई केली जाते; पण मशिदींवरील ध्वनीक्षेपकांच्या विरोधात कारवाई करण्याची वेळ आली की, पोलीस लगेचच शेपूट घालतात. ‘याला पोलिसांची मर्दुमकी म्हणावी का ? हा कुठला आला सर्वधर्मसमभाव ? यालाच धर्मनिरपेक्षता म्हणायचे का ?’, असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

मानखुर्द (मुंबई) येथे रहाणारी तरुणी कु. करिष्मा भोसले ही मध्यंतरीच्या कालावधीत सर्वांच्याच परिचयाची झाली; कारण तिच्यातील दिसलेला प्रखर धर्माभिमान ! तिच्या घराच्या शेजारी असणार्‍या मशिदीवरील ध्वनीक्षेपकाच्या आवाजामुळे त्रास होत असल्याने तिने पोलीस ठाण्यात जाऊन विरोध केला होता. खरेतर मुसलमानबहुल भागात एका हिंदु तरुणीने अशा प्रकारे आवाज उठवणे निश्चितच कौतुकास्पद आहे; पण भारतात हिंदूंचा आवाज दाबला जातो, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे करिष्मा हिलाही विरोधाला सामोरे जावे लागले. स्थानिक मुसलमानांनी ‘ध्वनीक्षेपकाचा त्रास होत असेल, तर घर बदला’, अशी धमकी तिला दिली. या धमकीमुळे शेवटी पोलिसांनीही तक्रार प्रविष्ट करण्यास नकार दिला. अर्थात् पोलिसांकडून हे असे होणार, ते ठाऊक होतेच; पण अनेक हिंदूंचा तिला पाठिंबा मिळाल्याने शेवटी महापालिकेने तो ध्वनीक्षेपक तेथून हटवला. भारतातील मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यासाठी करिष्मा भोसले हिच्याप्रमाणे सर्वांनीच रणरागिणी होण्याची आज आवश्यकता आहे.

(प्रतिकात्मक चित्र)

वैध मार्गाने लढ्याची आवश्यकता !

भारतात नेहमीच अन्य धर्मियांच्या कुठल्याही गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला की, लगेच ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे’, अशी ओरड केली जाते. दिवाळीतील फटाके किंवा गणेशोत्सवात वाजवली जाणारी गाणी, तसेच होळीमध्ये जाळली जाणारी लाकडे यांमुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा हिंदुद्वेष्ट्यांकडून केला जातो; पण मशिदींवरील ध्वनीक्षेपकांना क्वचितच विरोध होतो. भारतियांनी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांच्या आवाजाच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा. आतापर्यंत दिलेल्या आदेशांची तत्परतेने कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्या आदेशांचा अवमान होत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हायला हवी, तरच धार्मिक सलोखा टिकेल.