|
रामनाथी (गोवा) – गेल्या ७४ वर्षांत भारतात अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना घटनात्मक संरक्षण मिळालेले नाही. मदरशांमध्ये कुराण शिकवण्यासाठी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकार अनुदान देते; मात्र हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी विरोध केला जातो. हिंदूंची मंदिरे सेक्युलर सरकार चालवते; मात्र मशिदी-चर्च यांचे सरकारीकरण केले जात नाही. त्याचबरोबर लव्ह जिहाद, लँड जिहाद, आतंकवाद, धर्मांतर, हिंदूंच्या हत्या, गोहत्या आदी अनेक समस्यांचा सामना हिंदूंना करावा लागत आहे. भारतातील हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे; म्हणून एकच उपाय आहे आणि तो म्हणजे भारतात ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे ! यासाठी प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राचा संकल्प करावा, तसेच तन-मन-धन अर्पण करून आपला वेळ आणि क्षमता यांनुसार हिंदु राष्ट्राच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. ‘हिंदु जनजागृती समितीचे २० वे वर्ष : हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख आणि मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करून समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
या विशेष संवादात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे, समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी आणि समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे पुणे येथील श्री. चैतन्य तागडे आणि हरियाणा येथील डॉ. भूपेश शर्मा यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ २ सहस्र ३८६ जणांनी घेतला.
हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना हिंदूंपर्यंत पोचवण्यासाठी समिती विविध माध्यमांतून प्रयत्नरत ! – गुरुप्रसाद गौडा, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु राष्ट्रा’ची महान संकल्पना हिंदूंपर्यंत पोचवण्यासाठी समिती विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहे. समितीने धर्मशिक्षणवर्ग, हिंदूंचे संघटन आणि अनेक उपक्रम चालू केले आहेत. हिंदु धर्मावरील आघात रोखण्यात, तसेच हिंदुविरोधी षड्यंत्रांना वैध मार्गाने विरोध करण्यात हिंदूंना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतले जात आहे.
हिंदु राष्ट्रात उच्च-नीच असा भेदभाव नसेल ! – चेतन गाडी, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
मोगल आणि इंग्रज यांच्या राजवटीत मानवाला गुलाम बनवून विकण्याची अमानवीय प्रथा चालू झाली. हिंदु राष्ट्र ही राजकीय संकल्पना नसून धर्माधिष्ठित जीवन जगण्याची व्यापक संकल्पना आहे. हिंदु राष्ट्रात उच्च-नीच असा भेदभाव नसेल, तसेच कुणावरही अन्याय-अत्याचार होणार नाहीत. सर्वजण सुरक्षित असतील.
हिंदु धर्माला अपकीर्त करणार्यांच्या विरोधात हिंदूंमध्ये जागृती व्हायला हवी ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
देशातील हिंदुविरोधी शक्ती, डावी विचारसरणी, सेक्युलर नेते आणि चित्रपटातील कलाकार यांनी हिंदु धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना अपकीर्त करण्याची मोहीम चालवली आहे. भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा आरोप केला जात आहे. भारताविषयी संभ्रम पसरवणार्यांच्या आणि हिंदु धर्माला अपकीर्त करणार्यांच्या विरोधात हिंदु समाजामध्ये जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठांनी दिलेले अभिप्राय
हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एका व्यासपिठावर आणले ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस
हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एका व्यासपिठावर आणण्याचे कार्य केले आहे. समितीने हिंदु राष्ट्राच्या संदर्भात बौद्धिक स्तरासह प्रायोगिक स्तरावर कृती करण्याचे प्रयत्नही शिकवले, त्यासाठी धन्यवाद ! ‘हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर हिंदुहिताच्या कार्यात समितीने मोलाची भूमिका बजवावी, तसेच समर्पित व्हावे’, अशी मी प्रार्थना करतो.
दबावाला बळी न पडता हिंदु जनजागृती समितीने राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून कश्मीर
हिंदु जनजागृती समितीने मोठ्या कुटुंबाप्रमाणे २०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना बांधून ठेवले, हे कौतुकास्पद आहे. १४-१५ वर्षांपासून मी समितीशी जोडलेलो आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला, याविषयी मी सर्व काश्मिरी बांधव आणि ‘पनून कश्मीर’ संघटना यांच्या वतीने आभार मानतो. समिती कधीच कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करत आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ महत्त्वाचे ! – किशोर घाडगे, शिवसेना, कोल्हापूर
हिंदु जनजागृती समिती गेल्या २० वर्षांपासून हिंदूंना संघटित करणे, हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे, असे कार्य करत आहे. या कार्याप्रती हिंदु समाज ऋणी आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ महत्त्वाचे आहे. हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न करण्यासह समाजात जागृती करत आहे.