फ्रान्सप्रमाणे चर्चच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी भारतातही चौकशी आयोगाची स्थापना करावी ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्व हिंदु परिषद

अशी मागणी का करावी लागते ? सरकारी यंत्रणांच्या हे लक्षात येत नाही का ?

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – फ्रान्समध्ये चर्च आणि वासनांध पाद्री यांच्या कारवायांची चौकशी होत आहे. भारतातही पाद्री आणि धर्मांतराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले ख्रिस्ती प्रचारक यांची दुष्कृत्ये उघड करणे अन् त्यांच्या घृणास्पद षड्यंत्रापासून देशाला मुक्ती देणे यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक चौकशी आयोग स्थापन करावा. तसेच केंद्र सरकारने त्वरित धर्मांतरविरोधी कठोर कायदा करावा अन्यथा विहिंप एक व्यापक आंदोलन उभारेल आणि ख्रिस्ती पाद्र्यांचे अनेक षड्यंत्रे उघड करून धर्मांतरावर प्रतिबंध आणेल, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

डॉ. जैन पुढे म्हणाले की, चर्चची घृणास्पद कृत्ये कुणापासून लपून राहिली नाहीत. केवळ एकट्या फ्रान्समध्ये मागील ७० वर्षांत पाद्र्यांकडून झालेल्या लैंगिक शोषणाला ३ लक्ष ३० सहस्र लहान मुले बळी पडली आहेत. पूर्वी अशा पद्धतींचे आरोप फ्रान्सचे चर्च मान्य करत नव्हते; पण यासंदर्भात एका आयोगाने अडीच वर्षे गहन अभ्यास करून एक अहवाल सिद्ध केला. त्यानंतर पाद्र्यांच्या कुकृत्याविषयी बिशपला क्षमा मागावी लागली. आज जगभरातील चर्च लैंगिक शोषण आणि व्यभिचार यांच्या आरोपांनी घेरली आहेत. भारतात चर्चकडून चालवण्यात येणार्‍या अनाथलयातील शेकडो अनाथ मुलांची विदेशात विक्री होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. नक्षलवादी आणि पूर्वाेत्तर भारतातील आतंकवादी संघटना यांच्याशी त्यांचे संबंध असल्याविषयी आरोप झाले आहेत.