Prayagraj Mahakumbha Parva 2025 : गंगा नदीतील पाणी शुद्ध आणि आचमन करण्यायोग्य ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज महाकुंभपर्व २०२५

  • महाकुंभपर्वातील आतापर्यंतच्या कामांविषयी समाधान व्यक्त !

  • नव्या संस्थांना ५ जानेवारीपर्यंत भूमींचे वाटप करण्याचा प्रयत्न !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज : इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गंगा नदीत अधिक पाणी उपलब्ध आहे. निर्मल गंगा नदीचे दर्शन होण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नदीत अधिक पाणी सोडण्यात येणर आहे. एकूणच गंगा नदीतील पाणी शुद्ध आणि आचमन योग्य आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.

प्रयागराज येथे महाकुंभपर्वाच्या आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कारखान्यांचे सांडपाणी थेट गंगा नदीत सोडले जाऊ नये, यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ठिकठिकाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,

१. आतापर्यंत २० सहस्र संत, संस्था आणि अन्य संघटना यांना भूमींचे वाटप करण्यात आले आहे प्रग्यावालांनाही भूमींचे वाटप करण्याची प्रक्रिया चालू आहे. नव्या संस्थांना ५ जानेवारीपर्यंत भूमींचे वाटप करण्याचा प्रयत्न आहे.

२. नदीवरून ये-जा करण्यासाठी ३० पंटून (पिपा) पुलांपैकी २० पूल बांधून सिद्ध झाले असून उर्वरित पूल ३० डिसेंबरपर्यंत बांधून सिद्ध होतील.

३. नदीपात्रात ‘चकर प्लेट्स’ (वाळूवरून चालता यावे, तसेच वाहन घसरू नये, यासाठी बसवण्यात येणार्‍या तात्पुरत्या लोखंडी पट्ट्या) बसवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.

४. कुंभक्षेत्री २४ घंटे वीजेचा पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी विजेचे अनेक ‘सबस्टेशन्स’ उभारण्यात आले आहेत, तर काहींची उभारणी लवकरच करण्यात येणार आहे. आतापर्यंत ३८ सहस्र एल्.ई.डी. लाईट्स लावण्यात आले आहेत.

दश्‍वाशमेध घाटवर पूजन आणि आरती !

दश्‍वाशमेध घाटवर पूजन आणि आरती करतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दश्‍वाशमेध घाटवर पूजन आणि आरती केली. या वेळी त्यांनी त्रिवेणी संगमावर उभारलेल्या ‘टेंट सिटी’ची पहाणी करून अधिकार्‍यांना आवश्यक त्याचा गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना दिली.