त्रास देणार्‍या सावंतवाडी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करणार ! – महिला कृषी साहाय्यकांची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ? तक्रारी येऊनही पर्यवेक्षकावर कारवाई न करणारे कृषी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी या स्थितीला तेवढेच उत्तरदायी आहेत ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असलेले एक कृषी पर्यवेक्षक मानसिक त्रास देण्यासह गैरवर्तन करत असल्याचा आरोप तालुक्यातील महिला कृषी साहाय्यकांनी केला आहे. (शासकीय कर्मचार्‍यांची नैतिकता किती खालावली आहे, ते यातून दिसून येते ! – संपादक) ‘संबंधितावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा काम बंद आंदोलन करू’, अशी चेतावणी महिला कृषी साहाय्यकांनी दिली आहे. (‘निलंबनाची कारवाई म्हणजे काम न करता वेतन’, असे असल्याने निलंबन नको, तर अशा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) याविषयी माहिती मिळाल्यावर सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती निकिता सावंत आणि सदस्य यांनीही ‘संबंधित कृषी पर्यवेक्षकावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा त्याला कार्यालयात बसू देणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. (महिलांना अशी टोकाची भूमिका घ्यावी लागणे, प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)

संबंधित पर्यवेक्षकाचे येथील कार्यालयात एक मासापूर्वीच स्थानांतर झाले आहे. या पर्यवेक्षकाविषयी अन्यही तक्रारी असल्याचे समजते. ‘सहकारी महिला कर्मचार्‍यांशी पर्यवेक्षक करत असलेल्या असभ्य वर्तनाविषयी तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली; परंतु कोणतीही नोंद घेण्यात आली नाही’, असा आरोप महिला कर्मचार्‍यांनी केला. (महिला कर्मचार्‍यांनी केलेल्या आरोपांची चौकशी न करणारे संबंधित पर्यवेक्षकाचे वरिष्ठ अधिकारी पर्यवेक्षकाला पाठीशी घालत आहेत, असा समज निर्माण झाल्यास चुकीचे ठरेल का ? – संपादक) त्यामुळे अखेर १ ऑक्टोबरला महिला कर्मचार्‍यांनी सभापती सौ. सावंत यांची भेट घेऊन त्या कृषी पर्यवेक्षकाकडून होणार्‍या त्रासाविषयी माहिती दिली.