वांद्रे-कुर्ला या भागात बांधण्यात येत असलेला उड्डाणपूल कोसळला, १४ कामगार घायाळ

उड्डाणपूल पूर्ण बांधून झाल्यावर किंवा आता गर्दीच्या वेळी कोसळला असता, तर किती जीवितहानी झाली असती, याची कल्पनाच करता येणार नाही ! काही वर्षांपूर्वी घाटकोपर येथे मेट्रोसाठी बांधण्यात येणारा पूलही कोसळला होता. प्रगत तंत्रज्ञान नसतांना जुन्या काळातील पूल अनेक वर्षे वापरात असतात, तर नवीन बांधले जाणारे पूल कोसळण्यामागे नेमक्या त्रुटी काय आहेत ? आणि भ्रष्टता काय आहे ?, हे जनतेसमोर आले पाहिजे ! – संपादक

मुंबई, १७ सप्टेंबर (वार्ता.) – येथील वांद्रे-कुर्ला भागात बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग १७ सप्टेंबरच्या पहाटे ४.४० वाजताच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या घटनेत १४ कामगार घायाळ झाले आहेत. पोलीस आणि अग्नीशमनदलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन घायाळांना रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर येथील बी.एन्. देसाई रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अपघातात कोणीही बेपत्ता नाही, तसेच कोणत्याही कामगाराचा मृत्यू झालेला नाही. हा अपघात कशामुळे झाला, याचे अन्वेषण चालू आहे.