डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ५ जणांवर आरोप निश्चित !

पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला

डॉ. नरेंद्र दाभोलकर

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने ५ जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या वेळी पाचही आरोपींनी न्यायालयात ते निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर या दिवशी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस्.आर्. नावंदर यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी क्रमांक १, २, ३ आणि ५ असलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर अन् विक्रम भावे यांच्याविरुद्ध हत्येचा कट रचल्याचा गुन्हा निश्चित केला आहे. आरोपी क्रमांक ४ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी, तर आरोपींच्या वतीने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. या वेळी कोरोनाच्या कारणाने आरोपींनी अधिवक्ता आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस मुदत देण्याची विनंती केली; मात्र त्यास न्यायालयाने नकार दिला. आरोपींनी ‘गुन्हा मान्य नाही’, असे न्यायालयाला सांगितल्यामुळे आता या प्रकरणी ३० सप्टेंबरला सरकारी अधिवक्ता आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पुराव्याविषयीची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करणार आहेत.

या वेळी सचिन अंदुरे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते, तर अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होते.