२.९.२०२१ या दिवशी आपण ‘पुणे येथील डॉ. प्रमोद घोळे यांच्या साधनाप्रवासाच्या अंतर्गत त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधनेला आणि सत्सेवेला आरंभ कसा झाला ?’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/507823.html
३. सांगली येथून भोपाळ येथे जातांना मुंबई सेवाकेंद्रात परात्पर गुरुदेवांची भेट होणे
३ अ. मुंबईहून भोपळला जाणार्या विमानाची वेळ सकाळी लवकर असल्याने सांगलीहून आदल्या दिवशीच मुंबईला जावे लागणे आणि याविषयी परात्पर गुरुदेवांना सांगितल्यावर त्यांनी रात्रीच्या भोजनासाठी मुंबई सेवाकेंद्रात येण्यास सांगणे : मे १९९८ मध्ये माझे सांगली येथून भोपाळ येथे स्थानांतर (बदली) झाले. मुंबईहून भोपाळला जाणार्या विमानाची वेळ सकाळी लवकर असल्याने आम्ही आदल्या दिवशीच मुंबईला पोचणार होतो. त्या वेळी डॉ. नंदिनीताई (आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत) मला म्हणाल्या, ‘‘आपण परात्पर गुरुदेवांशी दूरभाषवर बोलूया.’’ त्यानुसार मी परात्पर गुरुदेवांना भोपाळला जाण्याच्या नियोजनाविषयी सांगितले. तेव्हा परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘मुंबईत आल्यावर रात्रीच्या भोजनासाठी मुंबई सेवाकेंद्रात या.’’ माझ्या संकोची स्वभावामुळे आणि ‘परात्पर गुरुदेव व्यस्त असतील’, असा विचार करून मी ‘नको’, म्हणालो. त्या वेळी परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘मी तुमची वाट पहात आहे.’’
३ आ. परात्पर गुरुदेवांनी भोपाळ येथे असलेले त्यांचे ज्येष्ठ बंधू, आधुनिक वैद्य असलेला पुतण्या यांचा पत्ता, भ्रमणभाष क्रमांक आणि अन्य माहिती देणे : आम्ही ठरलेल्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई येथील सेवाकेंद्रात पोचलो. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी अनेक साधकांची आमच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर परात्पर गुरुदेवांनी भोपाळ येथे असलेले त्यांचे ज्येष्ठ बंधू ती. भाऊकाका (आताचे पू. अनंत आठवले) आणि आधुनिक वैद्य असलेला पुतण्या यांचा पत्ता, भ्रमणभाष क्रमांक आणि अन्य माहिती आम्हाला दिली. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘नवीन शहरात आवश्यकता भासल्यास (आम्हाला २ लहान मुली असल्याने) त्यांच्याकडे जात जा.’’
३ इ. परात्पर गुरुदेवांच्या समवेत भोजन घेतांना अनौपचारिक बोलणे होऊन त्यांच्याशी जवळीक निर्माण होणे : रात्री मुंबई सेवाकेंद्रात परात्पर गुरुदेवांच्या समवेत भोजन घेतांना आमचे अनौपचारिक बोलणे झाले. त्यामुळे त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली. माझी पत्नी सौ. संगीता (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) परात्पर गुरुदेवांना म्हणाली, ‘‘नॉस्ट्रॅडॅमस् आणि इतर भविष्यवेत्त्यांनी सांगितले आहे की, काही वर्षांनी आपत्काळ येणार आहे.’’ त्यावर परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘कुणी महापुरुष अवतार घेणार आहे’, असेही त्यांनी सांगितले आहे.’’ तेव्हा सौ. संगीता म्हणाली, ‘‘त्या महापुरुषाने अवतार घेतलेलाच आहे.’’ त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी केवळ स्मितहास्य केले. मला आता त्याचा उलगडा होत आहे.
३ ई. भोपाळ येथे स्थानांतर झाल्यावर परात्पर गुरुदेवांनी भोपाळ येथे सनातनचे प्रसारकार्य चालू करण्यास आणि गुरुपौर्णिमा साजरी करण्यास सांगणे : भोपाळ येथे गेल्यावर ‘साधना कशी चालू रहाणार ?’, हा प्रश्न मनात येण्यापूर्वीच आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनीताईंनी सांगितले, ‘‘परात्पर गुरुदेवांनी भोपाळ येथे प्रसारकार्य चालू करायला सांगितले आहे.’’ त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘प्रवचन आणि सत्संग घेणे मला शक्य होईल; परंतु दायित्व घेऊन सेवा करणे मला जमेल का ?’ त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी ‘तुम्ही करू शकाल’, असे सांगून माझ्यावर विश्वास टाकला. नंतर परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘लगेच येणारी गुरुपौर्णिमा भोपाळला साजरी करा.’’
४. भोपाळ येथे आल्यावर परात्पर गुरुदेवांनी साधना करायला प्रोत्साहन देणे
४ अ. भोपाळ येथे प्रसारकार्याचा आरंभ करतांना आवश्यक असलेला आत्मविश्वास परात्पर गुरुदेवांनी वाढवणे : भोपाळ येथे गेल्यावर आम्हाला परात्पर गुरुदेवांच्या पुतण्याचे रुग्णालय असलेल्या वसाहतीत भाड्याने घर मिळाले. भोपाळ येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यावर त्याविषयी दूरभाषवरून परात्पर गुरुदेवांशी बोलणे झाले. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना सांगितले, ‘‘श्री. रोहित साळुंके आणि श्री. वैभव आफळे यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सिद्धता चांगली केली होती. कार्यक्रमाला उपस्थितीही चांगली होती; परंतु मला ताण आला होता.’’ तेव्हा परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘सचिन तेंडुलकरलाही भारताच्या क्रिकेट संघाचे कप्तानपद मिळाल्यावर प्रथम ताण आला होताच ना !’’ अशा तर्हेने प्रसारकार्याचा आरंभ करतांना आवश्यक असलेला आमचा आत्मविश्वास परात्पर गुरुदेवांनी वाढवला.
४ आ. ‘दुसर्यांना श्रेय देणे’, या परात्पर गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्यामुळे सेवा करण्यास प्रोत्साहन मिळणे : भोपाळ येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला ती. भाऊकाका आणि सौ. काकू आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी मराठी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या गठ्ठ्याच्या समवेत परात्पर गुरुदेवांच्या हस्ताक्षरातील ‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर आमच्या वहिनींचे (पू. अनंत आठवले यांच्या पत्नीचे) कुलदेवतेचे नामस्मरण चालू झाले आहे. अभिनंदन !’, असे लिहिलेली चिठ्ठी आली होती. अशा पद्धतीने ‘कर्ते करविते तेच (परात्पर गुरु डॉ. आठवले) असले, तरी ‘दुसर्यांना श्रेय देणे’, या परात्पर गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्यामुळे माझ्यासारख्या साधकांना सेवा करण्यास प्रोत्साहन मिळत गेले.
४ इ. परात्पर गुरुदेवांच्या प्रीतीमय बोलण्यामुळे साधना करण्यास प्रोत्साहन मिळणे : वर्ष १९९९ मध्ये परात्पर गुरुदेवांनी आम्हाला धनबाद येथे जायला सांगितले. त्या वेळी श्री. अरविंद ठक्कर धनबाद येथे प्रसाराच्या सेवेसाठी आले होते. स्थानिक साधक श्री. संजीवकुमार आणि अन्य साधक यांनी काही प्रवचने आयोजित केली होती. अनेक अधिकोष (बँका) असलेल्या एका भागात माझे एक प्रवचन आयोजित केले होते. प्रवचन झाल्यावर आम्ही घरी पोचलो. तेव्हा श्री. अरविंद ठक्कर यांनी सांगितले, ‘‘प्रवचन चालू असतांना मला एवढी गाढ झोप लागली होती की, मला अशी झोप अनेक वर्षांत लागली नव्हती.’’ त्या दिवशी रात्री अरविंदभैय्यांनी दूरभाषवर अन्य काही सूत्रांसह ही गोष्ट परात्पर गुरुदेवांना सांगितली. परात्पर गुरुदेव त्याविषयी माझ्याशी बोलतांना म्हणाले, ‘‘बघा, तुमच्या प्रवचनात किती चैतन्य होते ! अरविंदभैयांचे ध्यान लागले होते.’’ परात्पर गुरुदेवांच्या प्रीतीमय बोलण्यामुळे मला साधना करायला प्रोत्साहन मिळायचे.
(क्रमश:)
– डॉ. प्रमोद घोळे, बिबवेवाडी, पुणे. (२९.५.२०२०)