पुणे, २६ ऑगस्ट – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी वैद्यकीय सुट्टीवर असतांना २४ ऑगस्ट या दिवशी मुंढवा येथील हॉटेल ‘कार्निव्हल’ येथे गणवेशात जाऊन, मालक आणि व्यवस्थापक यांच्याशी हुज्जत घालत पैशांची मागणी केली. या घटनेची गंभीर नोंद घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी कुरकुटे यांना निलंबित केले आहे. संबंधित कुरकुटे यांना यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी.) जाळ्यात पकडले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा ही लाचखोर पोलीस अधिकारी अशीच आहे. (पहिल्यांदा पकडल्यावर कठोर शिक्षा न झाल्याचा हा परिणाम ? असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)